corona virus ; कोरोनामुक्त रुग्ण म्हणाला, 'अग्निपरिक्षा पार पडली'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 09:53 AM2020-03-25T09:53:23+5:302020-03-25T09:58:53+5:30
कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरला, अशा शब्दांत कोरोनामुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णाने 'लोकमत' शी बोलताना भावना व्यक्त केल्या. सर्वांनी काळजी घ्या, एकमेकांना जपा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
Next
ठळक मुद्देपुण्यात कोरोना प्रादुर्भावातून पूर्ण बरा झालेल्या रुग्णाच्या भावना लोकांनी घरीच राहण्याचा 'लोकमत'च्या माध्यमातून दिला सल्ला
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : गेले १४ दिवस म्हणजे अग्निपरिक्षाच होती. बंदिस्त जीवन, कोरोनाबाधित असल्याचा बसलेला शिक्का आणि प्रचंड मानसिक उलाघाल! पण 'हेही दिवस जातील' याच विश्वासाने आणि कुटुंबीय, नातेवाईक यांच्या खंबीर पाठिंब्याने हा लढा जिंकलो. कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरला, अशा शब्दांत कोरोनामुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णाने 'लोकमत' शी बोलताना भावना व्यक्त केल्या. सर्वांनी काळजी घ्या, एकमेकांना जपा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
दुबईहून प्रवास करून आल्यानंतर ताप, खोकला अशी लक्षणे दिसू लागल्याने पुण्यातील व्यक्तीने डॉक्टरांकडे धाव घेतली. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संकट कोसळले. त्यापाठोपाठ पत्नी आणि मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. तिघांनाही नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण क्षात दाखल करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या मुलालाही विलग करण्यात आले. पहिले दोन दिवस प्रचंड घबराटीचे होते, असे रुग्णाने सांगितले.
ते म्हणाले, डॉक्टरांची तत्परता, सकारात्मकता आणि आपल्याला लढायचे आहे, बरे व्हायचे आहे, ही जिद्द यामुळे आयुष्यातील सगळ्यात मोठया संकटातून तारून जाता आले. एकेक दिवस संयमाची परीक्षा घेणारा होता. गेले आठ दिवस आम्हाला तिघांनाही शिंक, खोकला, ताप असा कोणताच त्रास झाला नाही. त्यामुळे मनोधैर्य आणखी वाढले. आता घरी जाणार आहोत. सर्व प्रकारची काळजी घेणार आहोत आणि 14 दिवस होम क्वारंटाईन राहणार आहोत.'
शासनाला सहकार्य करा
मोबाईलवरून, नातेवाईकांकडून कोरोनाबाबत गंभीर होत चाललेली परिस्थिती सातत्याने समजत होती. सध्याचा काळ आपल्या सर्वांचीच परिक्षा पाहणारा आहे. शासन त्यादृष्टीने काम करत आहे. शासनाला पूर्ण सहकार्य करा, घरीच रहा, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.
- कोरोनामुक्त व्यक्ती