Corona virus : दहा मिनिटांच्या तपासणीसाठी वसूल केला जातोय दोन पीपीई किटचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 07:38 AM2020-07-25T07:38:00+5:302020-07-25T07:40:02+5:30
रुग्णालयांकडून सर्रास मनमानी : 'होम क्वारंटाईन पॅकेज'चा नवा फंडा
पुणे : एकीकडे कोरोनाची धास्ती तर दुसरीकडे खाजगी रुग्णालयांमध्ये होणारे खर्चिक उपचार अशा दुहेरी कात्रीमध्ये रुग्ण आणि नातेवाईक सापडले आहेत. कोरोनाबाधित रुग्णाची तपासणी केल्यानंतर बिलामध्ये दोन पीपीई किटचा खर्च समाविष्ट केला जात आहे. दहा मिनिटांच्या तपासणीसाठी दोन पीपीई किटचा खर्च का वसूल केला जात आहे, अशी विचारणा रुग्ण आणि नातेवाईकांकडून केली जात आहे. कॉर्पोरेट रुग्णालयांकडून 'होम क्वारंटाईन पॅकेज'ही जाहीर करून नवा फंडाही शोधण्यात आला आहेत.
एका रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला आणि १४ दिवस 'होम क्वारंटाईन'मध्ये राहण्यास संगण्यात आले. त्यानुसार, रुग्णासाठी एका नामांकित कॉर्पोरेट रुग्णालयाचे पॅकेज घेण्यात आले. तपासणीसाठी रुग्णाला हॉस्पिटलला नेण्यात आले. नर्सने होम क्वारंटाईन प्लॅन समजावून सांगितला. त्यानंतर एक चिठ्ठी लिहून हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमधून काही साहित्य घेऊन येण्यास सांगितले. चिठ्ठीमध्ये दोन पीपीई किटचाही समावेश होता. दोन पीपीई किटबाबत विचारणा केल्यावर 'आम्ही प्रत्येक रुग्णाला तपासताना पीपीई किट बदलतो' असे सांगण्यात आले.
आजूबाजूच्या प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन पीपीई किट आणण्यास सांगितले जात होते. मेडिकल स्टोअरमधून एका पीपीई किटचा १३५० रुपये इतका दर लावण्यात आला. दोन पीपीई किटचे २८०० रुपये बिल लावण्यात आले. दहा मिनिटांच्या तपासणीसाठी २८०० रुपयांच्या पीपीई किट आणि तपासणीचे वेगळे पैसे लावण्यात आले. याबद्दल विचारणा करण्यात आली असता रुग्णालयाच्या नियमानुसारच बिल आकारले जात असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. सर्वसामान्यांची अशी लूट होत असताना त्यांनी कुठे दाद मागायची, असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांनी 'लोकमत'शी बोलताना उपस्थित केला.
…......
'होम क्वारंटाईन पॅकेज'चा नवा फंडा
होम क्वारंटाईन पॅकेजसाठी ९ ते २० हजार रुपये आकारले जात आहेत. १७ दिवसांमध्ये ऑक्सिमीटर, मास्क, ग्लोव्हज, पाण्यात टाकण्यासाठी जंतुनाशक गोळ्या, थर्मामीटर, हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या आदी साहित्य पुरवले जात आहे. याशिवाय, टेलिमेडिसीनच्या सहाय्याने तब्येतीची विचारपूस, समुपदेशन आदींचा समावेश केला आहे. पॅकेजच्या नावाखाली लूट होत असल्याच्या तक्रारीही रुग्ण नाव छापून न येण्याच्या अटीवर करत आहेत. याबाबत राज्य सरकारने दर निश्चित करून ही लूट थांबवावी, अशी मागणीही होत आहे.