Corona virus : बाणेर- बालेवाडी येथील कोविड हॉस्पिटल येत्या गुरूवारपासून रुग्णसेवेत कार्यरत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 11:05 AM2020-09-02T11:05:45+5:302020-09-02T11:09:52+5:30
३१४ बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, वैद्यकीय सेवक व तत्सम सुविधा उभारण्याचे काम सध्या सुरू ..
पुणे : बाणेर येथे महापालिकेने सीएसआर फंडातून उभारलेले कोविड हॉस्पिटल येत्या गुरुवार(दि.३) पासून रुग्णसेवेत कार्यरत होणार आहे. शुक्रवारी या हॉस्पिटलचे उदघाटन संपन्न झाल्यावर ते सोमवारपासून कार्यरत होईल असे सांगण्यात आले होते. मात्र या ठिकाणी येणारे कोविड रुग्ण हे गंभीर स्वरूपाचेच किंबहुना ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटरची गरज असणारे राहणार आहेत. परिणामी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्यांना कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सेवा कमी पडू नये याची काळजी घेतली जात आहे. ३१४ बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, वैद्यकीय सेवक व तत्सम सुविधा उभारण्याचे काम सध्या सुरू आहे, ते येत्या दोन दिवसात पूर्ण होईल असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
-------
हॉस्पिटल महापालिकेच्याच ताब्यात राहणार
कोविड -१९ चा प्रभाव संपल्यावर हे हॉस्पिटल महापालिका ताब्यात घेणार असून, आज त्याची व्यवस्था खाजगी संस्थेला दिली असली तरी त्यावर महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे. येथील सर्व उपचार मोफत राहणार आहेत.
भविष्यात येथे पालिकेच्याच मालकीचे सर्व वैद्यकीय सुविधांसह अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, याकरिता कुठल्याही प्रकारचा ९९ वर्षांचा करार खाजगी संस्थेशी केलेला नाही असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकमत शी बोलताना स्पष्ट केले.