Corona virus : कर्ता पुरुष कोरोनाने हिरावून नेला, पण पाच कुटुंबीय बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 12:32 PM2020-04-10T12:32:50+5:302020-04-10T12:35:03+5:30
हे सर्वजण घरी परतले खरे; परंतु आपल्या कर्त्या माणसाला गमावून...
पुणे : आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या कर्त्या माणसाला कोरोना झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील अन्य पाच जणांनाही त्याच आजाराचा विळखा पडला. सर्वांवर उपचार सुरू होते. अखेर या आजाराने कर्त्या पुरुषाचा बळी घेतला. परंतु, अन्य पाचजण मात्र पूर्णपणे बरे झाले. त्या सर्वांना गुरुवारी रात्री घरी सोडण्यात आले. हे सर्वजण घरी परतले खरे; परंतु आपल्या कर्त्या माणसाला गमावून... हृदय हेलावून टाकणारी ही घटना आहे सहकारनगर येथील पद्मवतीची परिसरातील. याभागातील ४४ वर्षांच्या तरुणाला श्वास घेण्यात अडचण येत होती. त्याला तापही होता. कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्याला कर्वे रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुरिअरचे काम करणारा हा तरुण घरातील कर्ता पुरुष होता. त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समजताच नातेवाईकांना धक्का बसला. तरुणा पाठोपाठ त्याची पत्नी, आई वडील आणि अन्य दोघांची कोरोना तपासणी करण्यात आली. या पाचही जणांना कोरोना असल्याचे समोर आले. या सर्वांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. तर, त्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान त्याचा बुधवारी मृत्यू झाला. दरम्यान, त्याच्या कुटुंबियांचक चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. चौदा दिवसांपश्चात केलेल्या दोन्ही तपासण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री घरी सोडण्यात आले. मागील पंधरा दिवसांपासून एकमेकांपासून वेगळे राहणारे कुटुंबीय एकत्र आले. परंतु, त्यांच्यामध्ये 'तो' मात्र नव्हता. कुटुंबातील सर्वजण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले, परंतू त्यांच्यासोबत 'तो' नव्हता. कुटुंबातील सर्वजण पूर्ण बरे झाले याचा आनंद मानावा की घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे गेला याचे दु:ख मानावे अशा भावनिक पेचात हे कुटुंब आहे.