Corona virus : ससूनमधील कोरोनाबाधित मृतांचा आकडा पाचशे पार; बरे झालेल्या रुग्णांची संख्या पण दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 08:29 AM2020-08-01T08:29:09+5:302020-08-01T08:31:45+5:30
शहरातील एकुण मृत्यूपैकी ३८ टक्के प्रमाण
पुणे : ससून रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा आकडा शुक्रवारी ५०० पार गेला. शहरातील एकुण मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण ३८ टक्के एवढे आहे. मात्र, त्याचबरोबर रुग्णालयातील घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्याही मृतांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. सुरूवातीपासूनच ससून रुग्णालयामध्ये गंभीर रुग्ण सर्वाधिक असल्याने तेथील मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे.
पुण्यात कोरोना रुग्ण आढळून येऊ लागल्यानंतर सुरूवातीला नायडू रुग्णालयात दाखल केले जात होते. पण रुग्णांची प्रकृती ढासळू लागल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सुरूवात झाली. दि. २ एप्रिल रोजी रुग्णालयात पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर केवळ १४ दिवसातच ३४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही प्रमाणात मृत्यू कमी झाल्याने शंभरी गाठण्यासाठी एक महिना लागला. दि. १६ मे रोजी रुग्णालयात शंभरावा रुग्ण दगावला. त्यावेळचा मृत्युदर ३५.०८ टक्के एवढा होता. दि. १४ जूनपर्यंत मृतांचा आकडा २०३ पर्यंत गेला. त्यानंतर मात्र दाखल गंभीर रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही वाढत गेले. दि. ९ जुलै ३०३ मृत्यूनंतर पुढचे १०० मृत्यू १४ दिवसात झाले. तर ५०० चा आकडा पार करण्यासाठी केवळ नऊ दिवस लागले.
मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालयामध्ये आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून गंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी ससून रुग्णालयाला प्राधान्य दिले जाते. रुग्णालयातील मृत्यूपैकी अनेक मृत्यू विलंबाने आल्याने झाले आहेत. तसेच मृतांमध्ये अन्य गंभीर आजार असलेल्या रुग्णांचाही समावेश जास्त आहे. त्यामुळे शहरातील एकुण मृतांपैकी ३८ टक्के मृत्यू एकट्या ससूनमध्ये झाले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करण्यास उशिराने सुरूवात झाल्याने तेथील मृत्यू तुलनेने कमी आहेत. तसेच या रुग्णालयांची क्षमताही ससूनच्या तुलनेत कमी आहे.
--------------
सर्वाधिक व्हेंटिलेटर
ससून रुग्णालयामध्ये सध्या ८७ व्हेंटिलेटर बेड आहेत. शहरात अन्य कोणत्याही कोविड रुग्णालयामध्ये एवढे व्हेंटिलेटर नाही. त्यापाठोपाठ दिनानाथ रुग्णालयात ३० तर रुबी हॉल क्लिनिकमध्ये २७ व्हेंटिलेटर असल्याचे डॅशबोर्डवर दिसते. ससूनमध्ये आॅक्सिजन बेडही २२६ एवढे आहेत. आॅक्सिजनसह सर्व व्हेंटिलेटर व आयसीयु बेडवर रुग्ण असल्याने गंभीर रुग्णांची संख्या याच रुग्णालयात सर्वाधिक आहे.
----------
विभागीय डॅशबोर्डनुसार ससूनची सद्यस्थिती -
एकुण बेड - ४४६
आॅक्सिजनरहित बेड - १२५
आॅक्सिजनसहित बेड - २२६
व्हेंटिलेटररहित आयसीयु - ८
व्हेंटिलेटर - ८७
-----------
रुग्णालयातील मृत्युची स्थिती
दिवस ससून मृत्यू शहरातील एकुण मृत्यू
१६ मे १०० १८५
१४ जून २०३ ४४८
९ जुलै ३०३ ७८६
२२ जुलै ४०६ १०६८
३१ जुलै ५०१ १२८४ (30 june)
--------------------------------------------