Corona virus : कोरोना आपत्तीत पुणे शहरातील मृत्यूचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 01:45 PM2020-09-23T13:45:50+5:302020-09-23T13:46:55+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव जसा शहरात वाढत गेला, तसे जुलै महिन्यापासून मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
पुणे : कोरोना आपत्तीत पुणे शहरात ऑगस्टपर्यंत एकूण मृत्यूचा आकडा २०१९ च्या तुलनेत ४८३ ने वाढला असला तरी, गेल्या तीन वर्षांची सरासरी वाढ पाहता ती तुलनेने समान असल्याचे दिसून आले आहे.
पुणे महापालिकेकडे शासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जानेवारी, २०२० ते ऑगस्ट, २०२० अखेर शहरात २२ हजार २५१ जणांचे मृत्यू झाले. २०१९ ची तुलना करता ते ४८३ ने अधिक आहेत. कोरोना संसर्गाची शहरात मार्च अखेरीस सुरुवात झाल्याने, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन पुकारण्यात आले. संपूर्ण एप्रिल महिना हा लॉकडाऊनमध्ये गेल्याने, या काळात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. परिणामी एप्रिल महिन्यात गेल्या २ वर्षांतील मृत्यू पाहता ते साधारणतः ३०० ने कमी झाल्याचे आढळून आले.
मात्र मे महिन्यात हा आकडा शहरात १ हजारांनी वाढला. तर जून महिन्यात पुन्हा १ हजार ने कमी झालेला दिसून आला. गेल्या वर्षी जून महिन्यात शहरात चिकुन गुनिया, स्वाइन फ्लू व इतर साथीच्या आजारानेन मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे होते. जून, २०१९ मध्ये शहरात ३,८४२ जणांचा मृत्यू झाला होता. पण जून, २०२० मध्ये मृत्यूचे प्रमाण साधारणतः १ हजारने कमी झाल्याचे दिसून आले असून, या महिन्यात शहरात २,८६८ मृत्यू झाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव जसा शहरात वाढत गेला, तसे जुलै महिन्यापासून मृत्यू चे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षात सरासरी पावणे तीन हजार मृत्यू असलेला हा आकडा यावर्षी ५०० ते ७०० ने वाढला आहे. शहरात जुलै मध्ये ३ हजार २४६ तर ऑगस्टमध्ये ३ हजार २६२
मृत्यू झाले आहेत. यात महापालिकेस राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा जास्त आहे.
-------
पुणे शहरातील मृत्यू ( १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट)
२०१८ : २० हजार ३५५
२०१९ : २१ हजार ७६८
२०२० : २२ हजार २५१
-------