Corona virus: पुण्यात 'वर्क फ्रॉम होम' ची कडक अंमलबजावणी करण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश : राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:58 PM2020-03-18T18:58:46+5:302020-03-18T18:59:42+5:30
प्रत्येकाची टेस्ट करता येणार नाही. प्रोटोकॉल नुसारच टेस्ट करावी लागणार आहे.
पुणे: राज्यात कोरोना बाधितांची संख्या ४३ झाली असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहचली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवर पुण्यातसुध्दा वर्क फ्रॉम होम ची कडक अंमलबजावणी करण्यासंबंधीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले आहे.त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी नवलकिशोर राम उपस्थित होते.टोपे म्हणाले, पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होते आहे. एनआयव्हीमध्ये दिवसाला ४०० संशयितांचे अहवाल तपासले जात आहे.पुण्यात क्वारन्टाईनमध्ये साधारण 830 लोक राहू शकतील इतकी जागा तयार करण्यात आली आहे. तसेच 100 रुग्णांसाठी नायडू वॉर्ड आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 60 बेडचा आयसोल्युशन वॉर्ड देखील उपलब्ध केला आहे. तसेच पुण्यातील औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या यांसह खासगी संस्थांमध्ये देखील वर्क फ्रॉम होम ची कडक अंमलबजावणी लवकर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. पुण्यात 10 खासगी रुग्णलयात आयसोल्युशन वॉॅर्ड तयार करण्यात आले आहेत. पिंपरी मध्ये 8 खासगी रुग्णालयात आयसोल्युशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे.
टोपे म्हणाले, 42 रुग्णांपैकी 9 लोकं हे लोकल ट्रान्समिशन मुळे कोरोना बाधित आहे. तसेच कोरोना लक्षणे असलेल्या प्रत्येक नागरिकाची आपण तपासणी करत आहोत. परंतु, कोणीही येऊन तपासणी करा म्हंटल्यास तसे करता येणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली त्यांनी महाराष्ट्रात योग्य पद्धतीने काम सुरु असल्याचे ते म्हणाले.गर्दी कमी न झाल्यास मुंबई लोकल बंद करावी लागणार आहे. खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यास परवानगी दिली असली तरी त्याचा खर्च सरकार करणार नाही. प्रत्येकाची टेस्ट करता येणार नाही. प्रोटोकॉल नुसारच टेस्ट करावी लागणार आहे. जगातील ७ कोरोनाबधित देशातुन येणाऱ्या प्रवाशांना देखील विलगीकरण करुन देण्याबाबत केंद्राकडे मागणी केली आहे. होम क्वारन्टाईन केलेल्या प्रवाशाने केवळ घरीच राहणे आवश्यक आहे.-