Corona virus : पुण्यातील "कोरोना अतिसंक्रमणशील" भागात उद्यापासून ३ दिवस कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 04:36 PM2020-04-30T16:36:48+5:302020-04-30T16:40:01+5:30
'अतिरिक्त निर्बध आदेश' ; जीवनावश्यक वस्तूचे 'वितरण राहणार बंद
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहराच्या वेगवेगळया भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापुढील काळात शहरातील जो भाग कोरोना अतिसंक्रमनशील म्हणून घोषित केला आहे त्या भागात उद्यापासून 'अतिरिक्त मनाई' आदेश पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार 1 मे सकाळी सहापासून ते 3 मे रात्री बारा पर्यत अतिरिक्त निर्बध लागू करण्यात आले आहेत. त्यात दूध विक्री सकाळी दहा ते बारा व घरपोच दूध वितरण सेवा सकाळी सहा ते दहा वेळेत सुरू राहणार असून इतर सर्व जीवनावश्यक वस्तू यांची विक्री केंद्रे, दुकाने व वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून तो थांबविण्यासाठी तसेच परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.म्हणून वेगवेगळे आदेश काढून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. गुरुवारी काढण्यात आलेल्या आदेशात काही कडक निर्बध घालण्यात आले आहेत. यात रुग्णालय, अत्यवस्थ रुग्णांची वाहतूक तसेच औषधालय यांना सूट देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक व सेवा (किराणा माल, भाजीपाला, फळे, चिकन, मटण, अंडी) यांची विक्री केंद्रे, दुकाने, वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. दुधाच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बध नाहीत, शासकीय अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्याकडून चालू असलेल्या कार्यवाहीसाठी हे निर्बध लागू होणार नाहीत.
* या भागात असेल हा आदेश लागू ...
- समर्थ पोलीस स्टेशन संपूर्ण कार्यक्षेत्र, खडक पोलीस स्टेशन, फरासखाना पोलिस स्टेशन (कसबा पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, शहरातील सर्व पेठ परिसर)
- गुलटेकडी, महर्षींनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर, खद्दा झोपडपट्टी
- नवीन मोदीखाना, पुना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मस्जिद जवळचा परिसर, भीमपुरा लेन, बाबजान दर्गा,क्वाटर गेट रोड, शिवाजी मार्केट, सरबतवाला चौक, शितलादेवी मंदिर रोड,
- ताडीवाला रोड, तळजाई वसाहत, बालाजीनगर
- पर्वती दर्शन परिसर, लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्रा चौक परिसर,
- पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती पाटकर प्लॉट