Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने डॉक्टर, परिचारिकांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 11:00 PM2020-05-02T23:00:00+5:302020-05-02T23:00:01+5:30

डॉक्टर, परिचारिकांचे प्रोटोकॉलनुसार विलगीकरण करणेही शक्य होत नसल्याचे वास्तव समोर

Corona virus : doctor and nurses necessary due to corona patient increasing in the pune | Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने डॉक्टर, परिचारिकांची कमतरता

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने डॉक्टर, परिचारिकांची कमतरता

Next
ठळक मुद्देमहापालिकेसह ससून रुग्णालय,इतर रुग्णालयांची राज्य शासनाकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी

राजानंद मोरे
पुणे : शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांची कमतरता जाणवू लागली आहे. महापालिकेसह ससून रुग्णालय तसेच इतर कोविड रुग्णालयांनीही राज्य शासनाकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. पण पुरेशा क्षमतेअभावी सध्याच्या यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. महापालिकेतील डॉक्टर, परिचारिकांचे प्रोटोकॉलनुसार विलगीकरण करणेही शक्य होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
शहरात केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरूवातीला केवळ नायडूसह ससून रुग्णालयामध्ये व्यवस्था करण्यात आली होती. काही खासगी रुग्णालयांमध्ये मोजके रुग्ण होेते. पण रुग्णसंख्या वेगाने वाढत गेल्याने आता महापालिकेला रुग्णांच्या विलगीकरणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या नायडू, ससून, सिम्बायोसिस, भारती या कोविड रुग्णालयांसह महापालिकेची काही रुग्णालये, काही खासगी रुग्णालये, वसतिगृह, सणस मैदान येथील विलगीकरण कक्ष अशा तब्बल २३ ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करावी लागली आहे. सर्वाधिक (दि. १ मेपर्यंत) १७२ रुग्ण सिम्बायोसिस सेंटरमध्ये आहेत. त्याखालोखाल निकमार (१३९), सिंहगड वसतिगृह (१३५), ससून (१०६), नायडू (१०२), सणस मैदान (८१), भारती (१०५) यांसह अन्य खासगी रुग्णालयांमध्ये मिळून असे एकुण ११९५ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हाधिकाºयांकडून काही रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच परिचारिकांना कोविड साठी ड्युटी दिली आहे. पण त्यानंतर वाढल्या रुग्णसंख्येमुळे तज्ज्ञ मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे.
कोविड साठी केवळ एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता नसून श्वसन, फुफ्फुस, किडनी, हृदय यांसह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासत आहे. तसेच महत्वाचा घटक असलेल्या परिचारिकांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अतिदक्षता विभागामध्ये अनुभवी परिचारिकांचीच गरज असते. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागासह ससून व सिम्बायोसिसनेही अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे.  महापालिकेच्या नायडू रुग्णालयासह विविध रुग्णालये, तसेच विलगीकरण कक्षांमध्ये डॉक्टर व परिचाकांना ड्युटी देण्यात आली आहे. पण त्यांना काही दिवस काम केल्यानंतर क्वारंटाईन करणेही शक्य होत नाही. नायडू मध्ये मागील दीड महिन्यांपासून अनेक जण सलग सेवा करत आहेत. पण मनुष्यबळाअभावी त्यांना सुट्टी देता येत नाही. पालिकेच्या विविध रुग्णालयातील ओपीडी सुविधा टप्प्याटप्याने बंद करून तेथील कर्मचारी विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहेत. परंतु त्यानंतर मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. त्यासाठी शासनाकडे मागणी केली असली तरी पुरेसे कर्मचारी मिळत नाहीत. त्यामुळे कोविड रुग्णालयांसह महापालिकेतील कर्मचाºयांवरील ताण वाढू लागला आहे.
---------------
ससून रुग्णालयामध्ये सुमारे १ हजार परिचारिका आहेत. पण तिथे कोविडसह नॉन कोविड रुग्णालयामध्ये परिचारिका व डॉक्टरांना काम करावे लागत आहे. सात दिवस कोविड, सात दिवस विलगीकरण, सात दिवस नॉन कोविड आणि पुन्हा सात दिवस कोविड असे चक्राकार नियोजन करण्यात आले आहे. त्यांना सुट्या दिल्या जात नाहीत. याअनुषंगाने अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी विभागीय आयुक्तांकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. रुग्णालयातील रिक्त असलेल्या परिचारिकांच्या सुमारे ७५ पदांसह आणखी १५५ परिचारिकांची मागणी केली आहे. परिचारिकांची नितांत गरज असल्याचे त्यांनी विभागीय आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
--------------------
सर्वाधिक रुग्ण असलेल्या सिम्बायोसिस रुग्णालयानेही सुमारे ५० डॉक्टर व १०० परिचारिकांची मागणी केली आहे. त्यांच्याकडे जवळपास २०० रुग्ण असून रुग्णालयाची क्षमता ५०० पर्यंत आहे. सध्या पुरेसे मनुष्यबळ नसले तरी योग्यप्रकारे नियोजन करून गरज भागविली जात आहे. पण अतिदक्षता विभागासाठी अनुभवी परिचारिका हव्या आहेत. आणखी रुग्णसंख्या वाढणार असल्याने प्रशासनाकडे परिचारिकांची मागणी केली आहे. सध्या रुग्णालयात २०० परिचारिका असल्या तरी त्यांना सात दिवसच कोविड ड्युटी दिली जात आहे. नंतर सात दिवस क्वारंटाईन केले जाते.
- डॉ. विजय नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिम्बायोसिस रुग्णालय
----------------
रुग्णसंख्या वाढत असल्याने डॉक्टर व परिचारिकांचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे. त्यांना सुट्टीही देता येत नाही. टप्याटप्याने विविध रुग्णालयातील ओपीडी बंद करण्यात येवून तेथील कर्मचारी विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त, आरोग्य सचिवांकडे डॉक्टर, परिचारिकांची मागणी करत आहोत. त्यानुसार काही प्रमाणात मनुष्यबळ मिळत आहे. ५० तज्ज्ञ डॉक्टरांसह ५० वैद्यकीय अधिकारी, ३० प्रयोगशाळा तंत्रज्ञ,३० एक्स रे तज्ज्ञ, ५० परिचारिकांची मागणी केली आहे. काही प्रमाणात उपलब्ध होत आहे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
--------------
 

Web Title: Corona virus : doctor and nurses necessary due to corona patient increasing in the pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.