Corona Virus : कोरोनाबाधित रुग्णांवर 'प्लाझ्मा’चा परिणाम होतोय का? उत्तर आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:41 PM2020-08-12T12:41:24+5:302020-08-12T12:41:46+5:30
प्लाझ्मा थेरपी संशोधन पातळीवर असल्याने त्याचा रुग्णांवर होणाऱ्या परिणामांबाबतची माहिती प्लाझ्मा देणाऱ्या रुग्णालये व रक्तपेढ्यांकडे असायला हवी.
राजानंद मोरे
पुणे : देशभरात सुरू असलेले ‘प्लाझ्मा’चे उपचार अजूनही संशोधन पातळीवर आहेत. पुण्यातीलही काही रुग्णालयांना संशोधन तसेच प्लाझ्मा घेण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. पण काही रुग्णालयांकडून केवळ प्लाझ्माच्या देवाण-घेवाणीवरच भर दिला जात आहे. ‘प्लाझ्मा’ दिल्यानंतर रुग्णांवर नेमके काय परिणाम झाले, याची माहितीच घेतली जात नाही. याबाबत एका रुग्णालयाच्या रक्तपेढीकडूनच ‘लोकमत’ला ही माहिती मिळाली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आयसीएमआर) कडून प्लाझ्मा थेरपीच्या साठी रुग्णालयांना परवानगी दिली जात आहे. सुरूवातीला ‘क्लिनिकल ट्रायल’ (ओपन लेबल) साठी ठराविक रुग्णालयांना परवानगी दिली गेली. प्लाझ्माच्या फायद्याबाबत अद्याप त्यातून काही निष्कर्ष निघालेले नाहीत. तसेच ‘ऑफ लेबल’ म्हणजे प्रत्यक्ष ‘आयसीएमआर’ च्या संशोधनात सहभागी नसलेल्या रुग्णालयांनाही परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये प्लाझ्मा दिलेल्या रुग्णावर होणाऱ्या परिणामांची माहिती एकत्रित संकलित होणे अपेक्षित होते. पुण्यात ससून वगळता अन्य सर्व रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमधून इतर रुग्णालयातील रुग्णांना प्लाझ्मा दिला जातो. हा ‘प्लाझ्मा’ देताना काही रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा दिलेल्या रुग्णावर झालेल्या परिणामांची माहिती संबंधित रुग्णालयांकडून घेतली जात नाही. ही रुग्णालयेही त्याबाबतची माहिती कळवित नाहीत. संबंधित रुग्णालयांमध्येच याबाबतची नोंद ठेवली जाते, असे एका रुक्तपेढीमधून सांगण्यात आले.
अनियंत्रित पध्दतीने ‘प्लाझ्मा’ दिला जात असल्याने त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असल्याबाबत एकत्रित नोंद ठेवली जात नाही. तशी यंत्रणाही सध्या अस्तित्वात नाही. प्लाझ्मा देणाºया रक्तेपढ्यांकडे ही माहिती उपलब्ध होत नसल्याने एकत्रित अभ्यास केला जात नाही. ‘कामाचा खुप ताण असल्याने तसेच काही तंत्रज्ञ कोरोना बाधित झाल्याने हा अभ्यास करणे शक्य होत नाही. आता आम्ही ही माहिती गोळा करायला सुरूवात केली आहे,’ अशी माहिती एका रक्तपेढी प्रमुखांकडून देण्यात आली.
--------------
राज्य शासनाच्या २९ जूनच्या शासन निर्णयानुसार, प्लाझ्माच्या ‘ऑफ लेबल’ उपचारांची माहिती संबंधित रुग्णालयांनी स्वतंत्ररीत्या संकलित करावी, असे म्हटले आहे. तसेच सेंट्रल डॅग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, सार्वजनिक आरोग्य विभाग, आयसीएमआर, संबंधित प्राधिकाऱ्यांना देणे अपेक्षित असल्याचे नमुद केले आहे. पण सध्या ही माहितीच संकलित होत नसल्याचे दिसते.
-----------------
प्लाझ्मा थेरपी संशोधन पातळीवर असल्याने त्याचा रुग्णांवर होणाऱ्या परिणामांबाबतची माहिती प्लाझ्मा देणाऱ्या रुग्णालये व रक्तपेढ्यांकडे असायला हवी. तिथे स्वतंत्र एथिकल समितीही हवी. अन्यथा या थेरपीच्या उपयोगाबाबत एकत्रितपणे काहीच माहिती मिळणार नाही, असे ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
-------------------
प्लाझ्मा थेरपीचा कोरोनाबाधित रुग्णांवर फारसा परिणाम होत नसल्याचे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मागील आठवड्यातच स्पष्ट केले आहे. तसेच वेगवेगळ्या गटातील रुग्णांवरही त्याचा अभ्यास व्हायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी प्रत्येक रुग्णाचा अभ्यास होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
चाचण्यांमधील निष्कर्षाची प्रतीक्षा
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आयसीएमआर) कडून मे महिन्यात सुरू करण्यात आलेल्या प्लाझ्मा थेरपीच्या क्लिनिकल ट्रायल बहुतेक रुग्णालयांमध्ये पुर्ण झाल्या आहेत. मात्र, अद्याप ‘आयसीएमआर’कडून यातील निष्कर्ष जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा कोरोनाबाधित रुग्णांवर नेमका कसा परिणाम होतोय, हे गुलदस्त्यातच आहे. कोरोनामुक्त रुग्णाच्या रक्तात तयार झालेल्या अँटीबॉडी म्हणजे प्लाझ्मा काढून बाधित रुग्णाच्या रक्तात सोडल्यानंतर कोरोनाविरोधी प्रतिकारशक्ती तयार होते, असा दावा केला जातो. याबाबत दिल्लीसह अन्य काही शहरांमध्ये सकारात्मक परिणाम दिसत असल्याची उदाहरणे समोर आली आहे. मात्र, ही थेरपी किती परिणामकारक आहे, याबाबत आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २१ रुग्णालयांमधून ४५२ रुग्णांवर चाचणी केली जाणार होती. पुण्यातील ससून रुग्णालयाचाही त्यामध्ये समावेश आहे. ससूनमध्ये मे महिन्यात ही चाचणी सुरू झाली. प्लाझ्मा दिलेला पहिला रुग्ण बरा झाल्याचे रुग्णालयाकडूनच जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर चाचण्यांबाबत अधिकृत माहिती दिली गेली नाही.
‘प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या पुर्ण झाल्या आहेत. याबाबतचा अहवाल आयसीएमआरला सादर करण्यात आला आहे. याबाबतचे निष्कर्ष लवकरच जाहीर केले जातील. पुढील एक-दोन आठवड्यात माहिती मिळू शकते,’ अशी माहिती सुत्रांनी दिली.
--------------