Corona virus : परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडला म्हणून ‘पॅनिक’ होऊ नका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:01 PM2020-05-18T12:01:59+5:302020-05-18T12:09:43+5:30
रूग्णासोबत जवळचा संपर्क आला असेल तरच सर्वाधिक धोका
पुणे: कोरोना विषाणूचा संसर्ग हा कोरोनाबाधित रूग्णाच्या अतिजवळचा संपर्क (क्लोज कॉनटॅक्ट) आला असलेल्यांनाच प्रामुख्याने झाला असल्याचे आजपर्यंतच्या शहरातील आकडेवारीवरून निष्पन्न झाले. पुणे शहरातील एकूण रूग्णांपैकी ६०. ७ टक्के रूग्ण हे प्रारंभीच्या कोरोनाबाधित रूग्णाच्या क्लोज संपर्कातील मधीलच किंबहुना त्याच्या कुटुंबातीलच अन्य सदस्य आहेत. त्यामुळे आमच्या परिसरात, जवळच्या इमारतीत, शेजारच्या वस्तीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला म्हणून घाबरून (पॅनिक) जाऊ नका, असे आवाहन पुणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
शहरातील कोरोनाचा संसर्ग हा क्लोज संपर्काव्दारेच अधिक झाला असून, यामध्ये लागण झालेले अनेक जण हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. एखादा रूग्ण आढळून आल्यावर पालिका प्रशासनाकडून त्याच्या कुटुंबियांची तपासणी करण्याबरोबर, संबंतिध रूग्ण राहत असलेल्या १ किमी़ परिसरात तपासणी केली जाते. या तपासणीत आत्तापर्यंत कुटुंबाव्यतिरिक्त जे कोरोनाबाधित सापडले आहे ती टक्केवारी एकूण रूग्ण संख्येच्या ९ टक्के इतकीच आहे. तर परदेशवारी करून आलेल्या व्यक्तीपैकी आढळून आलेले रूग्ण हे शहरातील एकुण रूग्णांपैकी केवळ ०.६१ टक्के म्हणजेच १९ एवढेच आहेत.
पुणे शहरातील आत्तापर्यंतची कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ हजार २९५ एवढी असली तरी, यापैकी निम्म्याहून अधिक कोरोनामुक्त झाले आहेत. १६ मेपर्यंत उपचाराअंती बरे होणाऱ्यांची संख्या ही १ हजार ६९८ इतकी आहे.
----------------
कुठलीही खबरदारी न घेता अर्धा तास संपर्कात आला तरच धोका
पुणे महापालिकेच्या साथ रोग प्रतिबंधक विभागाचे प्रमुख सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन फुटापेक्षा कमी अंतरामध्ये व अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ मास्क न वापरता तुम्ही कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आला. तसेच हात मोजे न घालता त्याच्याशी हस्तांदोलन केले, त्याच्या शरीराला स्पर्श केला तर अशावेळीच त्याच्यापासून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाय रिस्क व लो रिस्क कॉनटॅक्ट मध्ये मोठा फरक आहे. हाय रिक्समध्ये डॉक्टर, नर्स, अथवा त्यांच्यावर उपचार करणाºया अन्य व्यक्तींनी व किंवा सहवासातील कुटुंबातील व्यक्तींनी मास्क, हात मोजे न घालता संपर्क ठेवला तरच त्याला बाधा होण्याची शक्यता असते.
-------------------
घाबरून जाऊ नका पण खबरदारी घ्या- महापौर
शहरात ज्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण सापडत आहेत, त्याप्रमाणात जास्त रूग्ण हे पूर्णपणे बरे होऊन घरीही गेले आहेत. यामुळे घाबरून ज जाता, खबरदारी म्हणून आजारी व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करावी व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच आपल्या परिसरात एखादा रूग्ण सापडला म्हणून घाबरून जाऊ नका, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
शहरातील तपासणीचे प्रमाण वाढले असल्याने आपल्याला रूग्ण वाढीचा आकडा मोठा दिसत असला तरी, दुसरीकडे शहरातील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे नारिकांनी घाबरून जाऊ नका. मात्र स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही महापौर म्हणाले.
-------------
कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला
पुणे शहरात ९ मार्च ला पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढही दुप्पट होत गेली. प्रारंभी चार, पाच व आठ दिवसांचा हा कालावधी आता १३ दिवसांवर आला आहे.
----------------