Coronavirus| इंग्लिश मीडियम शाळा १५ फेब्रुवारीपूर्वीच सुरू करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 12:32 PM2022-01-15T12:32:20+5:302022-01-15T12:34:45+5:30
ज्या भागात कोरोना रुग्ण नाही किंवा रुग्णांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत
पुणे : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन संघटनेने आपल्या शाळा पालकांच्या संमतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यास १५ फेब्रुवारी पर्यंतची वाट न पाहता. ज्या भागात कोरोना रुग्ण नाही किंवा रुग्णांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत.
राज्य शासनाने रुग्णसंख्येचा विचार करून राज्यातील सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शाळा सुरू करून काही दिवसातच त्या बंद केल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थी शाळा सोडून सर्व ठिकाणी जात आहेत. त्यामुळे शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. तसेच गेल्या दोन वर्षात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करावा. या उद्देशाने पालकांनी व संस्थाचालकांनी कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन करून नियमितपणे ऑफलाईन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणू हा आता आपल्याबरोबर हवेत असणारच आहे. आता त्याला बरोबर घेऊन जगणे शिकावे लागणार आहे. जोपर्यंत कोरोना जात नाही ; तोपर्यंत शाळा बंद ठेवणे चुकीचे ठरेल. तसेच सध्या केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचत आहे. उर्वरित ४० टक्के विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करावा लागणार आहे.
- डॉ.अ.ल.देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
अनेक भागांमध्ये कोरोना रुग्ण नाहीत, अशा भागातील शाळा सुरू झाल्या पाहिजेत. गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचे कधीही भरून निघणार नाही असे, नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार आहोत.
- निशा गुप्ता, पालक
मुले ऑनलाईन शिक्षणाला कंटाळली आहेत. काही दिवसांपासून ऑफलाईन लाईन शिक्षण सुरू झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. शाळा सुरूच राहाव्यात,असे त्यांना वाटत होते. घरी बसून ही मुले ‘घर कोंबडी’ होत चालली आहेत. त्यामुळे शाळा पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे.
- सुवर्णा सूर्यवंशी, पालक