Corona virus : पुणे जिल्ह्यातील सात लाख टन ऊस शिल्लक राहण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 02:51 PM2020-03-31T14:51:04+5:302020-03-31T14:54:07+5:30
कोरोनाचा साखर कारखान्यांना फटका
सोमेश्वरनगर : कोरोनाच्या धास्तीने ऊसतोडणी कामगार आता साखर कारखान्यावर थांबण्यास तयार नसून त्यांनी काम सोडून गावाकडचा रस्ता धरला आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सहा ते सात लाख टन ऊस शिल्लक राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कारखान्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकºयांचे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे.
जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या कोरोनाने आता ग्रामीण भागातील साखर कारखानदारीला कवेत घेण्यास सुरवात केली आहे. सध्या राज्यातील साखर कारखाने सुरू होते. मात्र, ऊस तोडणी कामगारांनी ऊस तोडण्यास मनाई केल्याने आता ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्थेचा कणा मोडण्याचे चिन्हे आहेत. सांगली जिल्ह्यात बारा कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने बंद करण्यात आले आहेत. त्याचे लोण महाराष्ट्रभर पसरले असून ऊस तोडणी कामगारांनी एल्गार केला. कारखाने बंद करा आम्हाला आमच्या गावाला जाऊद्या असे म्हणत बंद पुकारला आहे.
पुणे जिल्ह्यात अजून सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती, विघ्नहर, संत तुकाराम आणि भीमाशंकर हे साखर कारखाने सुरू आहेत. या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अजून सहा ते सात लाख टनाच्या आसपास ऊस शिल्लक असून ऊसतोडणी कामगारांच्या बंद मुले ऊस उत्पादक शेतकºयांचा हजारो एकरांवरील ऊस शिल्लक राहिला तर शेतकºयांचे कंबरडे मोडणार आहे. तर शेतकºयांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. एकीकडे साखर आयुक्तांनी राज्यातील साखर कारखाने सुरू ठेवावेत असे आदेश दिले आतांनाही जर ऊसतोडणी कामगार जर निघूनच गेले तर शिल्लक उसाची विल्हेवाट कशी लावणार असा प्रश्न साखर कारखान्यांना भेडसावत आहे.
साखर कारखाना बंद करा, आणि आम्हाला आमच्या गावाला सोडा असे म्हणत ऊसतोडणी कामगारांनी ऊस वजन काट्यावरच आंदोलने सुरू केले आहे. शेकडो ऊस तोडणी कामगार व महिला कामगार हे आता उघडपणे रस्त्यावर उतरत कारखाने बंद करा असा नारा देत आहेत.
याबाबत ऊसतोडणी कामगार म्हणाले की, रस्त्याने माणूस दिसेना, तुम्ही तुमच्या घरात आरामात बसला आहे, बागायतदार साधा उसाच्या फडात पण येत नाही, आमच्या गावातही म्हतारी माणसं, लहान लहान लेकरं आहेत, आम्हाला त्यांच्या जवळ जायचं आहे, या आजारामुळे सगळंच महागले आहे, तेल महागले, शेंगदाणे महागले आम्ही जगणार कसे शेजारी साखर कारखाना असून आम्हाला ४५ रुपये किलोने साखर खावी लागते तर गावाला आमची लहान लहान मुले आहेत म्हतारी माणसे आहेत, आम्हाला त्याच्याकडे जाउंदे अशी विनवणी केली.
----------------
कारखाने देणार एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उभा असलेला ऊस संपवण्यासाठी व ऊस तोडणी कामगारांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य देण्याचा निर्णय काही कारखान्यांनी घेतला आहे.
...................
गेटकेन चा फटका
अनेक कारखाने ऊसाचे जास्त गाळप करण्यासाठी शेतकºयांचा ऊस पाठीमागे ठेऊन गेटकेन उसाचे गाळप करतात, कारखान्याच्या मालकाचा ऊस ठेवायचा आणि परक्याचा ऊस गाळायचा अशी काही कारखान्यांची मानसिकता आहे. आज हीच मानसिकता सभासदांच्या मुळावर उठली आहे.
....................
उस उत्पादक शेतकरी धास्तावला
राज्यातील ऊसतोडणी कामगारांनी बंदचा एल्गार पुकारल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. एकतर दोन महिन्यांपूर्वी जाणारा ऊस अजून शेतातच उभा, त्यात वजन घटले आहे आता ऊसतोडणी कामगार निघूनच गेला तर काय करणार, कसे उसाचे गाळप होणार या चिंतेने शेतक?्याला ग्रासले आहे.