Corona virus : पुणे महापालिकेने भरले ३७०० रुग्णांचे पंधरा कोटींचे बिल; खासगी रुग्णालयांसोबत करार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 06:59 PM2020-10-31T18:59:27+5:302020-10-31T19:00:12+5:30
कोरोनावरील उपचारांसाठी शासकीय योजनांचा झाला लाभ
पुणे : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या तब्बल ३७०० रुग्णांचे बिल महापालिकेने भरले आहे. तब्बल १४ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल पालिकेने विविध रुग्णालयांना अदा केले आहे. आणखी शेकडो रुग्णांची बिले पालिकेकडे आलेली असून त्याचीही प्रक्रिया सुरु आहे.
शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला असून नवे रुग्ण घटत चालले आहेत. बरे होणा-यांचे प्रमाण ९० टक्क्याच्या पुढे गेले आहे. महापालिकेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. फैलाव रोखण्यासोबतच रुग्णांवर उपचारांसाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. पालिकेचे कोरोना उपचारांकरिता करार केलेल्या रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार उपचार केले जात आहेत.
बाधित आणि संशयीत रुग्णांना पालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना या खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास एक लाखांपर्यंत वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत. यासोबतच शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट योजनांचाही लाभ दिला जात आहे. यासोबतच जे नागरीक या योजनांसाठी पात्र ठरत नाहीत तसेच ज्यांच्याकडे पिवळे-केशरी शिधापत्रिका आहेत अशा रुग्णांनी पालिकेने करार केलेल्या १० खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्या बिलांची रक्कम महापालिका सीएचएस दराने अदा करीतआहे.
====
महापालिकेने खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेतलेल्या ३७०० रुग्णांची आजवरच्या उपचारांची १४ कोटी ८१ लाख रुपयांची बिले विविध रुग्णालयांना अदा केली आहेत. आणखीही बिले पालिकेला प्राप्त झालेली असून त्याचीही प्रक्रिया सुरु आहे. -
डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका