Corona virus : आकड्यांचा घोळ मिटेना; मुख्यमंत्री, केंद्रीय पथकाला दिलेले आकडेही वेगळे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 11:08 AM2020-08-03T11:08:08+5:302020-08-03T11:09:11+5:30
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या संख्येतला घोळही मिटताना दिसत नाही.
पुणे : कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्याचा घोळ केंद्रीय पथक व मुख्यमंत्र्यांसमोरही घालण्यात आला आहे. त्यांच्यासमोर करण्यात आलेल्या सादरीकरणामध्ये व पुणे महापालिकेअंतर्गत बाधित, घरी सोडलेले व अॅक्टिव रुग्णांच्या संख्येत तफावत आढळून आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येबाबत नेमके कोणते आकडे खरे मानायचे, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या संख्येतला घोळही मिटताना दिसत नाही. राज्य आरोग्य विभागाकडून दिली जाणारी माहिती, जिल्हा आरोग्य विभाग व महापालिका आरोग्य विभागाकडील माहितीत तफावत आढळून येत आहे. याबाबत ‘लोकमत’कडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. व्हेंटिलेटरील व आयसीयुमधील गंभीर रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने त्यात बदल करीत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डशी मेळ घातला.
बाधित रुग्णांच्या आकड्यांचा घोळ केवळ इथपर्यंत थांबला नसून केंद्रीय पथक व मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालातील माहिती आणि प्रत्यक्ष महापालिकेच्या अहवालातील माहितीतही तफावत आढळून आली आहे. केंद्रीय पथकाने दि. २८ जुलैला पुण्यात भेट दिली होती. यावेळी तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व विशेष कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांनी जिल्ह्याचे चित्र पथकासमोर मांडले. त्यामध्ये पुणे महापालिकेत दि. २६ जुलै रोजी एकुण बाधितांचा आकडा ५१ हजार ५५७ असल्याचे म्हटले आहे. तर त्याच दिवशीच्या महापालिकेच्या अहवालात हा आकडा ४८ हजार ५७ एवढा आहे. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्येही सुमारे साडे तीन हजारांची तफावत आहे. क्रियाशील रुग्णांचा आकडा मात्र एकसारखा आहे. हा आकडा योग्य असताना इतर आकड्यांमधील फरकामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्रीय पथकाला पुणे शहरातील बाधितांचा आकडा साडे तीन हजाराने वाढवून दिला गेला आहे.
------------------
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दि. ३० जुलै रोजी पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी जिल्हा आरोग्य विभागाने तयार केलेल्या अहवालात दि. २८ जुलै रोजी पुणे शहरातील रुग्णसंख्या ५३ हजार ५७७ असल्याचे उल्लेख केला आहे. तर महापालिकेच्या अहवालात हा आकडा ५० हजार ४३० तर जिल्हा आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवालात ४९ हजार ५३८ देण्यात आला आहे. घरी सोडलेले व अॅक्टिव रुग्णांची संख्या महापालिकेच्या अहवालात अनुक्रमे चार व दोन हजाराने अधिक दाखविण्यात आली आहे.
----------------------------
केंद्रीय पथकाला दिलेली माहिती व महापालिकेचा अहवाल (दि. २६ जुलै)
केंद्रीय पथक महापालिका तफावत
एकुण बाधित ५१,५५७ ४८,०५७ ३५००
घरी सोडलेले ३२,०७२ २८,५९३ ३४७९
मृत्यू १,१८७ १,१६६ २१
क्रियाशील १८,२९८ १८,२९८ ००
-------------------------------------------------------
मुख्यमंत्र्यांना दिलेली माहिती, जिल्हा व महापालिका आरोग्य विभागाचा अहवाल (दि. २८ जुलै)
मुख्यमंत्री जिल्हा महापालिका
एकुण बाधित ५३,५७७ ४९,५३८ ५०,४३०
घरी सोडलेले ३४,६१६ ३०,०१० ३०,०८०
मृत्यू १,२४० १,२८१ १,२१५
क्रियाशील १७,७२१ १७,७२१ १९,१३५
------------------------------------------------------------