Corona virus : इंदापूर शहरात पहिला कोरोना रुग्ण आढळला; ७८ वर्षीय व्यक्तीला संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 03:14 PM2020-06-06T15:14:50+5:302020-06-06T15:17:09+5:30
तीन महिन्यापासून प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळे शहर कोरोनामुक्त होते...
इंदापूर : इंदापूर शहरात मागील तीन महिन्यापासून प्रशासनाने घेतलेल्या काळजीमुळे शहर कोरोनामुक्त होते. मात्र इंदापुर येथील ७८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण दोन महिन्यांपासुन सोलापुरमध्ये वास्तव्यास होता.तो इंदापूर येथील रहिवाशी असून येथे ३१ मे रोजी मुक्काम करुन पुण्याला रुबी हॉल येथे उपचारासाठी दाखल केले होते.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर शहरातील मूळ रहिवासी असणारे व्यक्ती गेले दोन महिन्यांहून अधिक काळ सोलापूर येथे आपल्या लेकीकडे राहावयास होती. त्यांना शारीरिक इतर त्रास जाणवू लागल्याने ( दि. ३१ मे ) रोजी ती व्यक्ती इंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौक या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांमध्ये दाखल झाली. त्यानंतर ( दि.१ जून ) रोजी सदरच्या व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉस्पिटलला रुग्णवाहिकेने नेण्यात आले. त्यावेळी तेथे त्यांची पहिली कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने ( दि.४ जून ) रोजी दुसरी कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच इंदापूर प्रशासनाकडून दर्गा मस्जिद चौक, नेहरू चौक, टेंभुर्णी नाका असा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, तहसिलदार सोनाली मेटकरी आदींनी शनिवारी ( दि. ६ जून ) भागात भेट देवून पाहणी केली. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे.
मात्र, या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या घरातील तीन व्यक्ती, रुग्णवाहिका चालक व रुग्णाचा पुतण्या आणि रुग्णाला आपल्या रिक्षाने सोडणाऱ्या रिक्षा चालकासह संपर्कात आलेल्या एकूण एकोणीस व्यक्तींना इंदापूर शहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह मधील ( सीसीसी) मध्ये विलगीकरण करण्यात आले आहेत. त्यांचे स्वॅब टेस्ट ( घशाचे नमुने ) घेण्यात येत आहेत,अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
_____________
नागरिकांनी घाबरू नये : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौकात कोविड १९ टीम व प्रशासनाने भेट देवून, शनिवारी सकाळी पाहणी केली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही भेट देवून, नागरिकांना अहवान केले की, नागरिकांनी घाबरून जावू नये, बाहेरून येणाऱ्या नागरिकांची प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी, तसेच नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची अधिक काळजी घ्यावी असेही अवाहन यावेळी केले.