corona virus : पुण्यात कोरोनामुळे डॉक्टरचा पहिला मृत्यू; लॉकडाऊन काळात सेवा बजावताना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:47 PM2020-05-23T12:47:44+5:302020-05-23T12:48:06+5:30
लॉकडाऊन काळापासून हे डॉक्टर घोरपडी मुंढवा परिसरात त्यांच्या खासगी ओपीडीतून रुग्णसेवा करत होते.
पुणे: मुंढवा- घोरपडी भागातील एका डॉक्टरचा रूग्ण सेवा बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात डॉक्टर पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. संबंधित डॉक्टरवर ११ मे पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. १३ मे रोजी त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ससून रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले.
लॉक डाऊन काळापासून सदरचे डॉक्टर हे घोरपडी मुंढवा परिसरात त्यांच्या खासगी ओपीडीतून रुग्णसेवा करत होते. रुग्णांची सेवा करत असताना त्यांना कोरोणाचा संसर्ग झाला. त्यातच दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. रुग्णसेवा करताना कोरोना आजाराचा संसर्ग झालेल्या मृत डॉक्टर कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व जन आरोग्य मंचचे डॉ. संजय दाभाडे यांनी केली आहे. कोरोना आजाराच्या गंभीर परिस्थितीच डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून स्थानिक पातळीवर रुग्णसेवा करीत आहेत. या घटनेत पुण्यातील पहिल्या डॉक्टरचा कोरोना आजाराच्या संसगार्मुळे मृत्यू झाला आहे. या गंभीर परिस्थितीत वस्ती पातळीवर खासगी रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक सोयीसुविधा साधने सरकारने उपलब्ध करून द्यावीत.तसेच स्वत:चा जीव धोक्यात घालून डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या महत्वाच्या घटकाचा विमा देखील सरकार कडून उतरविण्यात यावा. अशी मागणी डॉ. संजय दाभाडे यांनी यावेळी केली आहे.