Corona virus : पुणे महापालिकेच्या इतिहासातील पहिली 'ऑनलाईन सभा'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 08:24 PM2020-07-17T20:24:49+5:302020-07-17T20:25:32+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकांच्या बैठका, मुख्य सभा ऑनलाईन घेण्यासंदर्भात राज्य शासनाने निर्देश दिले आहेत.
पुणे : महापालिकेच्या इतिहासातील पहिली 'व्हर्च्युअल' मुख्य सभा शुक्रवारी पार पडली. या मुख्यसभेला बहुतांश नगरसेवकांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. तर, विविध पक्षांचे गटनेते, पदाधिकारी आणि काही मोजके नगरसेवक या सभेला प्रत्यक्ष उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकांच्या विविध विषय समित्यांच्या बैठका, मुख्य सभा ऑनलाईन घेण्यासंदर्भात राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेनेही मुख्य सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी बोलावण्यात आलेल्या इतिहासातील पहिल्याच ऑनलाईन मुख्यसभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सभापती, गटनेते, पदाधिकारी, अधिकारी, नगरसचिव, नगरसचिव कार्यालयातील कर्मचारी आणि ऑनलाइनची सेवा पुरवणारे तंत्रज्ञ यांचीच सभागृहात उपस्थिती होती. सभापती म्हणून उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी काम पाहिले.
सभा सुरू झाल्यानंतर मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी कोटरर्सच्या बिलांसंदर्भात सभागृहात हातामध्ये फलक घेऊन आंदोलन केले. परंतु, बहुतांश नगरसेवक ऑनलाईन असल्याने सर्वचजण बोलण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ऑनलाईन असलेले विविध पक्षांचे नगरसेवक बोलत असताना गटनेते मात्र सभागृहात शांत बसून होते. त्यामुळे नगरसेवकांच्या प्रश्नांची फारशी गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. सभा तहकुबी मांडताना ऑनलाइन असलेल्या सदस्यांनी विरोध केला, परंतु, सभागृहातील गटनेत्यांनी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध न केल्याने सभा तहकूब करण्यात आली.