Corona virus : पुणे रेल्वे स्थानकावर ४०० जणांचे होणार विलगीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 11:15 AM2020-04-03T11:15:16+5:302020-04-03T11:24:37+5:30
कोचिंग डेपोत ५० डब्यांमध्ये कक्षनिर्मिती करणार
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने भारतीय रेल्वेनेहीरेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष निर्माण केले जात आहेत. पुणे विभागात घोरपडी येथील कोचिंग डेपोमध्ये सुमारे ५० डब्यांमध्ये कक्ष निर्मितीचे काम एक-दोन दिवसांत सुरू होणार असून हे डबे पुणे रेल्वे स्थानकावर उभे केले जाणार आहेत. त्यामध्ये जवळपास ४०० जणांच्या विलगीकरणाची व्यवस्था होऊ शकेल.
जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्राथमिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. सर्व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालये तसेच अन्य आस्थापनांमध्ये विलगीकरण कक्ष निर्माण केले जात आहेत. त्यामध्ये रेल्वेनेही पुढाकार घेऊन रेल्वे डब्यांमध्ये कक्ष निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडेही सुमारे ५० विलगीकरण कक्ष निर्माण करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. घोरपडी येथे रेल्वेचा कोचिंग डेपो आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या डब्यांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करून कक्ष तयार केले जाणार आहेत. त्याबाबत यांत्रिक विभागाला सूचना दिल्या आहेत. या कक्षांत सुमारे ४०० रुग्णांची व्यवस्था होऊ शकते.
विलगीकरण कक्ष तयार करताना डब्यांमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. प्रामुख्याने स्लीपर कोचच्या डब्यांचा वापर केला जाईल. डॉक्टर व परिचारिकांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. स्वच्छतागृह, बाथरूमची स्वतंत्र व्यवस्था असेल.
........
रेल्वे डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना मध्य रेल्वेकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार घोरपडी येथील कोचिंग डेपोमध्ये पुढील एक-दोन दिवसांत हे काम सुरू केले जाणार आहे.- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे.
.............
रेल्वे डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याचा निर्णय योग्य आहे; पण त्याचबरोबर रेल्वेने आपली रुग्णालयेही सुसज्ज करायला हवीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथेही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप