Corona virus : पुणे पोलीस दलात कोरोनामुळे चौथा बळी; सहायक पोलीस उपनिरीक्षकांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 11:44 AM2020-09-07T11:44:34+5:302020-09-07T11:45:27+5:30
कोरोनाशी लढताना आतापर्यंत पुणे पोलीस दलातील चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. पुणे शहर पोलीस दलातील कोरोनाचा चौथा बळी आहे. सुरेश सीताराम दळवी (वय ५०) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
सुरेश दळवी हे वाहतूक शाखेच्या सिंहगड विभागात नेमणूकीला होते. त्यांना अंगदुखी व अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांची १४ ऑगस्ट रोजी कोरोनाचा चाचणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना लवळे येथील सिंबायोसिसच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे १४ दिवस उपचार केल्यानंतर त्यांनी २९ ऑगस्ट रोजी घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर १४ दिवस घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांच्या भावाने त्यांना रुग्णालयात नेले. परंतु, उपाचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.
कोरोनाशी लढताना आतापर्यंत पुणे पोलीस दलातील चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लॉकडाऊनच्या काळात पोलीस दलात कोरोनाचा फैलाव मर्यादित होता. त्यानंतर अनलॉकच्या काळात शहरातील नागरिकांबरोबरच पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरु लागला आहे. आतापर्यंत ७०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७५ टक्के बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.