Corona virus : पुण्यात मंगळवारी ४४ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : चार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 09:04 PM2020-04-14T21:04:55+5:302020-04-15T12:39:01+5:30
पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही ३२२
पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची होणारी वाढ सलग दुसऱ्या दिवशीही ४० च्यावर गेली असून, आज नव्याने नायडू हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल व शहरातील इतर खासगी रूग्णालयांमध्ये एका दिवसात ४९ रूग्णांची वाढ झाली़. दरम्यान कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूचे सत्रही अद्याप थांबले नसून, मंगळवारी ४ रूग्णांचा मृत्यू झाला़ ससून हॉस्पिटलमधील तीन महिला व एक २७ वर्षीय युवकाचा यात समावेश आहे. या चारही जणांना अन्य आजारांनी ग्रासलेले होते.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय यामध्येमृत्यू झाला असून तो मद्यपी होता. तर घोरपडी गावातील ७७ वर्षीय, कोंढव्यातील ५० वर्षीय व ४२ वर्षीय महिलांचा मृत्यू झाला आहे. या तीनही महिलांना कोरोनाच्या संसगार्पूर्वीच अन्य आजारांनी ग्रासलेले होते.
गेल्या आठवड्यात दहा ते वीस नव्याने होणारी कोरोनाबाधित रूग्णांची ही वाढ गत दोन दिवसांपासून ४० च्या वर प्रति दिवस गेली आहे. परिणामी आजपर्यंत पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही ३२२ झाली आहे. यामध्ये ससूनमधील ८२ तर पुणे महापालिका हद्दीतील नायडू व खाजगी हॉस्पिटलमधील २४० रूग्णांचा समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी सातपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शहरात आत्तापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये बारामतीमधील एक व अन्य जिल्ह्यातील दोघांचा (पुण्यात उपचार घेणाऱ्या) समावेश आहे. सध्या सहा कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती गंभीर असून यापैकी ५ जण हे ससून तर एक जण खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
मंगळवारी आणखी एक कोरोनाबाधित रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले असून, आजपर्यंत उपचाराअंती पूर्णत: बरे झालेल्या रूग्णांची संख्या २८ इतकी आहे.
सील केलेल्या महर्षीनगर ते आरटीओ कार्यालय पर्यंतच्या परिसरात तसेच कोंढवा परिसरातील प्रत्येक नागरिकांची ८ एप्रिलपासून वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीमध्ये ४२५ जणांना कोरोना संसर्गाची शक्यता असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले़ यापैकी १० जणांचे कोरोना संसर्ग झाल्याचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहे. सध्या नायडू हॉस्पिटलसह सिम्बॉयसिस हॉस्पिटल लवळे येथे ५६ व भारती हॉस्पिटल येथे ४ कोरोनाबाधित रूग्ण आहेत.
शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता प्रशासनाकडून १६ मार्चपासून घरोघरी जाऊन सर्व्हे करून प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे. आजपर्यंत २३ लाख ५५ हजार ४७२ जणांची तपासणी करण्यात आली असून, या तपासणीमधून ३० जणांची नायडू हॉस्पिटलमध्ये रवानगी करण्यात आली़ तर ३१५ जणांना होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या़ व १ हजार १२ जणांना महापालिकेच्या तपासणी केंद्रांमध्ये पुढील आरोग्य तपासणीसाठी (स्क्रिनिंग) पाठविण्यात आले आहे.