Corona virus : मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन झालेल्या पुण्यातील 'जम्बो कोविड' रुग्णालयात त्रुटीच त्रुटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 12:05 PM2020-09-04T12:05:26+5:302020-09-04T12:06:25+5:30
जम्बो कोविड रुग्णालयातील वैद्यकीय असुविधांवरुन मागील दोन दिवसांपासून गोंधळ सुरु
पुणे : मोठा गाजावाजा करीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयातील असुविधांवरुन मागील दोन दिवसांपासून गोंधळ उडालेला असतानाच पुणे महापालिकेने केलेल्या पाहणीमध्ये त्रुटीच त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी तात्काळ दूर करण्याबाबतचे पत्र आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे यांना देण्यात आले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन महाराष्ट्र शासन, महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने 800 बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे. येथे वैद्यकीय सेवा पुरवठादार म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल्स सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला काम देण्यात आले आहे. तर, ‘एएए हेल्थकेअर पुणे’ यांना प्रधान सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. जम्बोच्या व्यवस्थापनाबाबत पालिकेकडून वारंवार बैठका घेण्यात आल्या आहेत. जिल्हा टास्क फोर्सने मंगळवारी केलेल्या पाहणीत तसेच पालिका आयुक्तांनी बुधवारी केलेल्या पाहणीमध्ये भरपूर त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या दुर करण्याची मागणी पीएमआरडीएकडे करण्यात आली आहे.
काय आहेत त्रुटी?
1. 800 बेडसाठी आवश्यक वैद्यकीय तज्ञ अधिकारी वर्ग व वैद्यकीय कर्मचारी मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.
2. जम्बोमधील रुग्णांना नाश्ता व जेवण वेळेत मिळत नाही.
3. डेडबॉडी मॅनेजमेंट व्यवस्थित होत नसल्याने आयसीएमआर पोर्टलवर नोंदणी करणे शक्य होत नाही.
4. संशयित रुग्णांकरिता 50 बेड उपलब्ध करण्याचे निर्देश असूनही केवळ दहाच बेड उपलब्ध आहेत.
5. डेटा एंट्री ऑपरेटर पुरेशा प्रमाणात नाहीत.
6. बाधित रुग्णांना दाखल करुन घेणे अपेक्षित असतानाही ओळख व रुग्णाचा इतिहास उपलब्ध नसल्याचे कारण देत दाखल करुन घेतले जात नाही.
7. कर्मचाऱ्यांचे अद्ययावत हजेरीपत्रक उपलब्ध नाही.
8. एएए हेल्थकेअर पुणे प्रिन्सिपल कन्सल्टंट यांचे लाईफलाईन व अन्य यंत्रणांवर नियंत्रण नाही.
9. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्ण दाखल करुन घेण्यास अधिक वेळ लागतो.
10. सर्व संबंधित यंत्रणांमध्ये आपसात समन्वय नाही.