Corona virus : नातेवाईकांनी हक्क सोडलेल्या मृतदेहांवर पुणे पालिका करणार अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:57 PM2020-04-10T23:57:03+5:302020-04-11T00:04:37+5:30
काही कोरोना आजारामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांनी सहकार्य न केल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना अंत्यविधी करावे लागले आहेत.
पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. कोरोनाचा विषाणू अत्यंत संसर्गजन्य असल्याने, त्या आजारामुळे मृत्यू पावलेल्यांच्या दफन-दहनाबाबत पालिकेने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या मृतदेहावरील हक्क नागरिक सोडतील त्यांचा दहनविधी पालिकेकडून केला जाणार आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांच्या निर्देशानुसारच हिंदू-ख्रिश्चन-मुस्लिम समाजाच्या रुग्णांचे अंत्यविधी करावयाचे आहेत. विविध समाजातील कोरोनाग्रस्त मृतदेहांचे अंत्यविधी करताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत.
काही नातेवाईकांनी सहकार्य न केल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना अंत्यविधी करावे लागले आहेत. तसेच अवचित प्रसंगी मृतदेहांची वाहतूक स्मशानभूमी किंवा दफनभूमी पर्यंत करण्याकरिता खासगी रुग्णवाहिका तयार न झाल्याने काही नातेवाईकांनाही अडचण निर्माण झाली. काही मृतदेहांवरील कायदेशीर हक्क नातेवाईकांनी नाकारल्यामुळे शासकीय अथवा खासगी संबंधित रुग्णालयामध्ये पोलीस पंचनामा करून हे मृतदेह महापालिकेच्या ताब्यात विल्हेवाटीकरिता सुपूर्त केले होते. कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यविधीसाठी सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. भारतीय साथरोग अधिनियम १८९०, अंतर्गत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
नातेवाईकांनी ताब्यात घेतलेल्या मृतदेहांवर जर अग्नि देऊन अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास पालिकेच्या संबंधित परिमंडळ निहाय निश्चित केलेल्या स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीमध्ये करण्यात येणार आहेत. नातेवाईकांनी ताब्यात घेतलेल्या मृतदेहांवर दफनविधी करावयाचे असल्यास परिमंडळ निहाय निश्चित केलेल्या दफनभूमीमध्ये विधी केले जातील. यासोबतच नातेवाईकांनी कायदेशीर हक्क सोडलेल्या व पोलिसांनी परिमंडळ निहाय निश्चित केलेल्या स्मशानभूमीमधील पंचनामा केलेले कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचा मृतदेह हा विद्युत अथवा गॅस दाहिनीमध्ये दहन केला जाणार आहे. यामध्ये जर काही स्वयंसेवी संस्थानी मदत करण्याची तयारी दाखवली तर त्यांच्या मदतीने अंत्यविधीची कार्यवाही करावी असेही नमूद करण्यात आले आहे.