Corona virus : पुण्यातील गणेश मंडळे भक्तांसाठी तयार करणार नवीन आचारसंहिता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 09:56 PM2020-07-22T21:56:07+5:302020-07-22T21:56:26+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार ही आचार संहिता असणार आहे.
पुणे : गणेशात्सव साजरा करताना दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी कशी व्यवस्था असावी, फिजिकल डिस्टेन्सिंग कसे पाळता येईल. उत्सव साधेपणाने कसा साजरा करता येईल, याविषयी गणेश मंडळे आचार संहिता तयार करणार आहेत. शासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार ही आचार संहिता असणार आहे.
शहर पोलीस आणि प्रमुख मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
शहरात कोरोना संसर्गाची व्यापी दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सव एक महिन्यावर आला असून त्याची तयारी आता सुरु आहे. या कोरोना संकटात गणेशोत्सव साजरा करताना काय केले पाहिजे. गणेश मंडळांची काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी आज ही बैठक झाली. या बैठकीत सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्याचा अर्थ सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सवासाठी परवानगी देण्यात आली आहे. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीना परवानगी नसणार आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच शहरात सुमारे साडेतीन लाख घरांमध्ये गणरायाचे आगमन होते. विसर्जनाच्या दिवशी त्यांची नदी काठी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी मंडळांनी नागरिकांना घरीच विर्सजनाचे आवाहन करावे, असे यावेळी सांगण्यात आले.
पुण्यातील गणेश मंडळाने उत्सव मूर्तीचे विसर्जन करत नाही़. त्यामुळे शासनाचा नियम येथे लागू होत नाही.
पोलीस आयुक्त व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले़ तसेच गणेश मंडळांनीच भाविकांसाठी आचार संहिता तयार करावी, असे त्यावर प्रशासनाबरोबर एकत्र बसून सर्वांना सोयीने साधेपणाने उत्सव कसा साजरा करता येईल, हे निश्चित करण्याचा यावेळी ठरले.
़़़़़़़़
शहरातील कोरोनाच्या सावटाखाली होणाऱ्या गणेशोत्सवात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा. उत्सव साधेपणाने कसा साजरा करता येईल, यावर विचार करुन त्यांचे म्हणणे समजावून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती.
डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त
.......
पोलिसांची भूमिका सकारात्मक आहे. भाविकांसाठी आचारसंहिता मंडळे एकत्र येऊन तयार करणार आहेत. दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदा सर्व रोषणाई रद्द केली आहे. फक्त उत्सव ठिकाणी मध्ये महिरप असणार आहे.तसेच मान्यवरांच्या हस्ते होणाऱ्या आरत्याही रद्द केल्या आहेत. हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी सर्व जण एकत्र प्रयत्न करीत आहोत.
महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट