Corona virus : कोरोनाग्रस्तांची सविस्तर माहिती घेण्याचे पुणे महापालिकेचे संबंधित रुग्णालयांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 06:39 PM2020-04-10T18:39:57+5:302020-04-10T18:52:10+5:30
रुग्णालयांनी सहा तासांच्या आत माहिती कळविणे बंधनकारक
पुणे : पुण्यातील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला असून नवीन रुग्णांना शोधण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर आहे. शहरातील ११ खासगी रुग्णालये, ससून सर्वोपचार रुग्णालय, पालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय आणि औंध शासकीय रुग्णालयात कोरोना बधितांवर उपचार केले जात आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी रुग्णांची परदेश प्रवासाची आणि आजारांची माहिती व्यवस्थित घेतली जात नाही. ही माहिती विस्तृत स्वरूपात घेण्याच्या आणि ही माहिती रुग्ण उपचारांसाठी दाखल होताच सहा तासांच्या आत पुणे महापालिकेला पाठविण्याच्या सूचना सर्व संबंधित रुग्णालयांना केल्या आहेत.
संबंधित रुग्णालयांनी कोरोना आजाराच्या रूग्णांची विस्तृत स्वरूपाची सर्व 'ट्रॅव्हल हिस्ट्री' तातडीने घेणे अनिवार्य आहे. जेणेकरून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधणे व त्यांना तातडीने पुढील कार्यवाहीसाठी रूग्णालयात आणणे अथवा विलगिकरण करणे अधिक सोईस्कर होईल. रुग्णालयांनी हे काम अतिशय तत्परतेने केल्यास 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' वेळेत होऊ शकेल. त्यामुळे संबंधितांवर उपचार करण्यास लवकर सुरुवात होऊ शकते. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या सर्व वैदयकिय अधिकाऱ्यांना याबाबत सुचित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सर्व रुग्णांची विस्तृत स्वरूपाचा तपशील घेण्यात यावा. जसे संशयित किंवा कोरोना झालेल्या व्यक्ती दाखल झाल्यानंतर या रूग्णांची मेडिकल व इफिडिमी ओलॉजीकल हिस्ट्री अतिशय सखोल घेणे आवश्यक आहे. हिस्ट्री घेताना सर्व रूग्णांची दिवस निहाय व रूग्णाला लक्षणे सुरू होण्याच्या ३ दिवस आगोदर पासून ते रूग्णालयामध्ये दाखल होईपर्यंतची दिनचर्या अतिशय विस्तृतपणे घेणे आवश्यक करण्यात आली आहे. संबंधित रूग्ण कोणाकोणास भेटला, किती वेळ प्रत्येकाबरोबर व्यतीत केला, त्या रूग्णाने काय काय केले याची इतंभुत माहिती प्रत्येक तासागणिक घेणे आवश्यक आहे. ही माहिती 'हिस्ट्री शिट' मध्ये नमुद करणे आवश्यक असून ही माहिती घेताना 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट' आणि ' लो रिस्क कॉन्टॅक्ट' याचा पूर्ण तपशील नाव, पत्ता, फोन नंबर इत्यादीसह नमुद करणे अत्यावश्यक आहे.
कोरोना केसेसमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने कॉन्टॅक्टची सर्व माहिती वेळ न दवडता कळविणे आवश्यक आहे. ही माहिती पालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांना सहा तासांच्या आत कळविण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही माहिती मिळताच सर्वेक्षण अधिकारी सर्व कॉन्टॅक्ट शोधून त्यांची तपासणी करण्याचे नियोजन करणार आहेत.
-----------------
रुग्णालयांनी सहा तासांच्या आत माहिती कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सहा तासांच्या आत माहिती प्राप्त न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी रूग्णालयाची असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.