Corona virus : कोरोनामुळे कर्फ्यू लावलेल्या भागात अडचणीत आहात का? तर मग इथे फोन करा, मेसेज पाठवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 04:34 PM2020-04-10T16:34:53+5:302020-04-10T16:40:30+5:30
दुध, कोरडा शिधा, किंवा औषधे वगैरे आवश्यक गोष्टींची यांची तात्काळ मदत केली जाणार
पुणे: कोरोनामुळे कर्फ्यू लावलेल्या भागातील वृद्ध, निराधार, परित्यक्ता महिला यांची अडचण होऊ नये यासाठी तहसील कार्यालयाने हेल्पलाईन सुरू केली आहे. ०२०-२४४७२८५०या दुरध्वनीवर संपर्क साधला किंवा ९८५०७१९५९६या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवला तर दुध, कोरडा शिधा, किंवा औषधे वगैरे आवश्यक गोष्टींची यांची तात्काळ मदत केली जाणार आहे.
कर्फ्यू लावण्यात आलेल्या पुण्याच्या मध्यभागातील पेठा तसेच मोमीनपुरा, कागदीपुरा, तक्क्या, टिंबर मार्केट, लोहियानगर, या मोठ्या परिसराची फार अडचण झाली आहे. निराधार तसेच वृद्ध, परित्यक्ता महिला, घरकाम किंवा कष्टकरी वर्गाची संख्या या परिसरात बरीच आहे. गवरी आळी येथील भाजी मंडई, किराणा भुसार मालाची दुकाने काही दुध केंद्र ही बंद झाली आहेत. त्यामुळे या दैनंदिन गोष्टींचा या भागातील पुरवठा थांबला आहे. पैसे आहेत असे लोक साठा करून ठेवल्याने व्यवस्थित आहेत, तर पैसेही नाही व कसली मदतही होत नाही यामुळे गरीब घरातील चुल पेटणेही अवघड झाले आहे.
कोरोना आपत्ती निवारण कक्षाच्या प्रमुख तहसीलदार त्रुप्ती कोलते यांनी सांगितले की अशा नागरिकांनी वर दिलेल्या क्रमाकांवर संपर्क साधावा. त्यांना लगेच मदत पोहचवण्यात येईल. सरकारी कर्मचारी त्यांच्या घराजवळ येईल. परिसरातील सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील अशा नागरिकांची यादी करून पाठवली तरी त्यांच्यापर्यंत मदत देता येईल. अशा कार्यकर्त्यांनीही संपर्क साधावा. त्यामुळे एकत्रित मदत करणेही शक्य होईल.
कोलते म्हणाल्या, या भागातून कोरोना बाधीत रूग्ण सापडत असल्याने संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. कोणालाही कोणत्याही कारणाशिवाय रस्त्यावर यायला मनाई आहे. मंडई व दुकानेही बंद आहेत. त्यामुळे या भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यातून काही कुटुंब व निराधार नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी ही हेल्पलाईन आहे. फोनवर संपर्क साधणे शक्य होत नसल्यास मामलेदार कचेरी, खडकमाळ आळी,शिवाजी रस्ता येथील.आपत्ती निवारण कक्षात एकट्याने व मास्क घालून येऊन अडचण सांगितली तरी चालेल. कक्ष व त्यातील दुरध्वनी सेवा २४ तास कार्यरत आहे अशी माहिती कोलते यांनी दिली.
लक्षणे दिसली की तपासून घ्या
या भागात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळेच संसर्गाची भीती आहे. नागरिक वाळीत टाकले जाण्याच्या भीतीतून ताप, सर्दी खोकला हे आजार अंगावरच काढत आहेत. तसे न करता तत्काळ सरकारी किंवा खासगी डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यातूनच कोरोना चा संसर्ग टाळता येणे शक्य आहे.
तृप्ती कोलते,तहसीलदार, पुणे शहर.