कोरोना विषाणूचा 'शुभमंगल'लाही बसला फटका! लाखों रुपयांचे 'अर्थचक्र' थंडावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 01:32 PM2020-05-15T13:32:29+5:302020-05-15T13:46:08+5:30

खेड तालुक्यातील सुमारे अडीचशेहुन अधिक मंगल कार्यालयांचे सद्यस्थितीत 'लॉक' डाऊन.

Corona virus hits 'Shubhamangal' too! The 'economic cycle' of lakhs of rupees has stopped | कोरोना विषाणूचा 'शुभमंगल'लाही बसला फटका! लाखों रुपयांचे 'अर्थचक्र' थंडावले 

कोरोना विषाणूचा 'शुभमंगल'लाही बसला फटका! लाखों रुपयांचे 'अर्थचक्र' थंडावले 

Next
ठळक मुद्देमंगल कार्यालये बंद : व्यावसायिक धास्तावले विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेले अनेक लहान - मोठे व्यवसाय ठप्प सध्या घरगुती लोकांमध्ये अगदी साध्या पद्धतीने पार पाडले जात आहेत विवाह लॉकडाऊन पूर्वी हॉल बुकिंग केलेल्यांची अ‍ॅडव्हान्स रक्कम संबंधितांना केली परत

खेड (शेलपिंपळगाव) : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रभाव वेगवेगळ्या उद्योग व्यवसायावर पडला असून विवाह मंगल कार्यालयांनाही त्याचा फटका बसत आहे. खेड तालुक्यातील सुमारे अडीचशेहुन अधिक मंगल कार्यालयांचे सद्यस्थितीत 'लॉक' डाऊन आहे. परिणामी विवाह मंगल कार्यालय व्यावसायिकांसह त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे एकमेकांवर अवलंबून असलेले लाखो रुपयांचे 'अर्थचक्र' बंद झाले आहे.
     मार्चपासून ते जुलै महिन्यापर्यंत विवाहाचे सर्वाधिक मुहूर्त असतात. ग्रामीण भागात साधारण रब्बी हंगामातील शेतकामे उरकल्यानंतर लग्नांचा हंगाम सुरू होतो. यापार्श्वभूमीवर अगदी दिवाळीतच अनेक वर - वधू पित्यांनी मार्च ते जुलै महिन्यातील तिथीनुसार विवाह कार्यालये बुकिंग करून ठेवलेली होती. मात्र मार्च महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरली; अन क्षणिक होत्याचं नव्हतं झालं. 
    या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करून राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यानंतर केंद्र सरकारनेही संपूर्ण देशात २२ मार्चपासून 'लॉकडाऊन' जाहीर केले. जे अजूनही उठलेले नाही. या कालखंडात शासनाने सामाजिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला आहे. 
      ज्यामुळे धुमधडाक्यात साजरे होणारे 'शुभमंगल' बंद झाले असून विवाहासाठी बुकिंग केलेली कार्यालये ओस पडली आहेत. तर विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेले अनेक लहान - मोठे व्यवसाय ठप्प झाले असून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याची माहिती मयुरी मंगल कार्यालयाचे संचालक पप्पू शेळके, नानाश्री मंगल कार्यालयाचे मालक सचिन घोलप व आवटे लॉन्सचे संचालक नागेश आवटे यांनी दिली.
            .....................
कोरोनाची साथ पसरल्याने विवाह सोहळे बंद आहेत. ज्यामुळे मॅनेजमेंट व्यावसायिक, ज्वेलर्स, स्वयंपाक बनविणारे आचारी, वेटर, किराणा विक्रेते, डेअरी पदार्थ बनविणारे व्यावसायिक, वीज - डेकोरेटर्स, जनरेटर व्यावसायिक, घोडागाडी व्यावसायिक, वाजत्री, ब्राह्मण, परिवाले, ढोल - लेझिम पथके, डिजे व्यावसायिक, बँडवाले, भेटवस्तु विक्रेते, कापड विक्रेते (बस्ता), शिवणकाम व्यावसायिक (टेलर), मेहंदी डिझायनर, अँकर, पत्रिका - फ्लेक्स प्रिंटींग व्यावसायिक, ब्यूटी - पार्लर व्यावसायिक, फुल विक्रेते, फोटोग्राफर, फेटेवाले, जाहिरात व्यावसायिक, वाहन व्यावसायिक, फटाके विक्रेते आदींचे काम बंद झाले आहे.

मागील दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या साथीमुळे प्रशासकीय आदेशानुसार विवाह मंगल कार्यालये बंद आहेत. ज्यामुळे आजपर्यंत एका मंगल कार्यालयांच्या किमान पन्नासहून अधिक बुकिंग रद्द झाल्या आहेत. विवाह कार्यालये बंद असूनही त्यावरील मेंटेनन्स मात्र सुरूच आहे. लॉकडाऊनपूर्वी हॉल बुकिंग केलेल्यांची अ‍ॅडव्हान्स रक्कम संबंधितांना परत केली आहे.
    - नवनाथ आवटे, कार्यालय व्यावसायिक शेलगाव.

.....................

 सध्या घरगुती लोकांमध्ये अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पाडले जात आहेत. ज्यामध्ये अनेक गोष्टींना फाटा दिला जात आहे. तर काहींनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत. मात्र विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेल्या अनेक व्यावसायिकांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 
  - गुलाब वाडेकर, डीजे व्यावसायिक बहुळ.

Web Title: Corona virus hits 'Shubhamangal' too! The 'economic cycle' of lakhs of rupees has stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.