Corona virus : मानवाच्या क्वारंटाईनचा पक्षी;प्राण्यांवर चांगला परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 07:00 AM2020-04-12T07:00:00+5:302020-04-12T07:00:12+5:30
माणसांनी या प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करून त्यांना पिढ्यान पिढ्या क्वारंटाईन केले आहे...
पुणे: जगाला ग्रासणाऱ्या कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी माणूस एकमेकांपासून विलग (क्वारंटाईन) होऊन बंदीवासात जातो आहे, पण त्याच्या या क्वारंटाईनचा पक्षी व प्राणीजगतावर मात्र चांगला परिणाम झाला आहे. पाणवठ्यांवरील त्यांच्या संख्येत वाढ तर होऊ लागलीच आहे, शिवाय काही दुर्मिळ पक्षी, प्राण्यांचेही तिथे दर्शन होऊ लागले आहे.
जेजूरीजवळ पिंगोरी गावात दाट झाडीचा एक भला थोरला डोंगर आहे. तिथे वन विभागाच्या साह्याने इला फौडेशन काम करते. पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे त्याचे संचालक आहेत. डोंगराच्या काही भागातील पाणवठ्यांवर फौडेशनच्या वतीने कँमेरे लावले आहेत. त्यांच्यासमोर दिवसारात्री, कधीही काहीही हालचाल झाली की त्याचे छायाचित्र टिपले जाते. एकदोन आठवड्यात ७० हजार वगैरे छायाचित्रे हे कॅमेरे टिपतात. राहूल लोणकर, राजकूमार पवार, ऊमाजी खोमणे, डॉ. ओंकार सुमंत हे आणखी काहीजण फौडेंशनचे काम पाहतात.
या कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्र खोटे बोलत नाहीत असे सांगून पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे म्हणाले, मागील ४ वर्ष आणि लॉकडाऊनचे गेले १५ दिवस या काळातील छायाचित्र पाहिली आणि याचा शोध लागला. एरवी या पाणवठ्यांवर माणसांचीही वर्दळ असते. त्यावेळी म्हणजे गेली ४ वर्षे आम्हाला फक्त बुलबूल, साळुंकी, घरकावळा, डोमकावळा, होला, शिंपी, शिंजीर असे पक्षी पाणवठ्यावर दिसायचे. मागच्या पंधरा दिवसात झालेला बदल म्हणजे आता फँटेल, नर्तक, स्वर्गीय नर्तक, निलांग असे अनेक दुर्मिळ पक्षी दिसू लागलेत. या आणि एकूणच सर्व पक्षांच्या पाणवठ्यावर यायच्या संख्येतही वाढ झाली. दिवसातून तीन वेळा आता ते येतात, पुर्वी एकदाच येत.
कँमेरा रात्रीची छायाछित्रही इन्फ्रा रेड किरणांमध्ये टिपतो अशी माहिती देऊन डॉ. पांडे म्हणाले, सस्तन प्राण्यांमध्येही हे बदल झाले आहेत. मुंगूस, घोरपड, तरस, चिंकारा, रानमाजंर असे प्राणी पूर्वी दिसत. आता चौसिंगा, भेकर, खोकड, कोल्हा, साळींदर, रानडुक्कर, ऊदमांजर हे प्राणी दिसत आहेत.
माणसांनी या प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करून त्यांना पिढ्यान पिढ्या क्वारंटाईन केले आहे. आपल्याला १५ दिवस क्वारंटाईन केले तळ त्याचा त्रास होतोय, त्यांना किती झाला असेल याचा विचार करून कोरोनापासून मुक्ती मिळाल्यावर तरी मानवाने पक्षी, प्राण्यांच्या अधिवासाचा ऱ्हास थांबवावा अशी भावना डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.
................
बिबट्या हा अतिशय सावध प्राणी आहे, त्याची बुद्धीही ( संवेदना) तीक्ष्ण आहे. त्यामुळे धोका असेल तिथे तो फिरकतही नाही. मागील पंधरा दिवसात मात्र एक बिबट्या सहकुटूंब सहपरिवार पाणवठ्यावर निवांत फेरी मारत असतो, असे डॉ. पांडे म्हणालै.