Corona virus : जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी तात्काळ दूर करा : अतिरिक्त आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 12:42 PM2020-09-01T12:42:37+5:302020-09-01T12:43:16+5:30
जम्बो कोविड रुग्णालयात रुग्णांना परस्पर उपचारासाठी आणू नये
पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मधील त्रुटी तात्काळ दूर करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले असून नागरिकांनीही डॉक्टरांनी सांगितल्याशिवार कोरोना रुग्णांना परस्पर जम्बो रुग्णालयात आणू नये असे आवाहन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी केले आहे.
जम्बो कोविड सेंटरमध्ये बुधवारपासून प्रत्यक्ष रुग्ण येण्यास सुरुवात झाली. परंतू, येथील विभागांची व्यवस्थित माहितीच नागरिकांना आणि पालिकेच्याही अधिकाऱ्यांना मिळत नाही. रुग्ण आल्यानंतर कोठे चौकशी करायची, रुग्णांना कोणी ‘अटेंड’ करायचे, अॅडमिशन फॉर्म कुठे भरायचे इथपासून जेवणापर्यंत नागरिक तक्रारी करु लागले आहेत. त्यातच रविवारी जम्बो सेंटरमध्ये दोन रुग्ण दगावल्याने रुग्णालय व्यवस्थापनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जम्बो रुग्णालयाच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी पुणे महापालिकेकडे आहे. त्यामुळे पालिकेवरही दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. रविवारी दोन रुग्णांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली असून अतिरीक्त आयुक्त अगरवाल यांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसह, पालिकेच्या आरोग्य व अन्य विभागातील अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. रुग्णालयामधील राहिलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे अशाच रुग्णांना जम्बो सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अन्य रुग्णांना थेट प्रवेश देण्यात येणार नसल्याचे अगरवाल यांनी स्पष्ट केले.