Corona virus : पुणेकरांसाठी 'महत्वाची'बातमी : शहरातील सर्वात मोठे कोविड सेंटर महापालिकेने केले बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 02:06 PM2020-11-06T14:06:10+5:302020-11-06T14:40:15+5:30
पुणे शहरातील साडे तीन हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असलेल्या हे कोविड सेंटर पुणे महापालिका व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होते.
पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच बहुतांश कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून होम आयसोलेशन चा पर्याय निवडला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने पुण्यातील सर्वात मोठे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे शहरातील साडे तीन हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असलेल्या विमाननगर येथील कोविड सेंटर पुणे महापालिका व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होते. मात्र शुक्रवारपासून ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. नव्याने आढळून येणारी कोरोनाग्रस्तांची संख्या कमी कमी होत आहे. त्याच धर्तीवर विमाननगर येथील कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे.
कोरोना रूग्णांची संख्या घातल्याने रुग्णालयांमधील खाटा आता रिकाम्या राहू लागल्या आहेत. शहरात आजमितीस १२ हजार ८३४ खाटा रिकाम्या आहेत. तर, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८७ टक्क्यांवर आली आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने शहरात खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. खासगी तसेच शासकीय रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
शहरात सर्व प्रकारचे मिळून १५ हजार ४१७ बेड आहेत. रुग्णालयात २ हजार २८३ रुग्ण उपचार घेत असून १२ हजार ८३४ खाटा रिकाम्या आहेत. ऑक्सिजनयुक्त ४ हजार ५८ खाटांपैकी २ हजार ५४४ खाटा रिकाम्या असून १ हजार ५१४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आसीयू ३३० आणि व्हेटिंलेटरचे २१६ बेड रिकामे आहेत.
------
कोरोनाची शहरातील सध्याची स्थिती
पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ४८ हजार ३९३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ६२ हजार ६४७ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५२ हजार ८४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ४९७ इतकी आहे. तर आत्तापर्यंत ४ हजार ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे़ आज दिवसभरात शहरात २ हजार ३७२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे़.
पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये १७६ रुग्णांवर उपचार सुरू असून ३ हजार १४९ रुग्ण घरी उपचार घेत आहेत.