Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत 223 रुग्णांची वाढ ; 9 रूग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:13 PM2020-05-18T12:13:28+5:302020-05-18T12:18:48+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 4 हजारांच्या पुढे ग्रामीण भागात कोरोना बाधितांनी गाठली शंभरी
पुणे : पुणे जिल्ह्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. रविवार (दि.17) एका दिवसांत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 223 ने वाढ झाली. तर 9 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. तर शहरी भागा सोबतच आता कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात देखील वाढू लागला आहे. ग्रामीण भागात रविवार 6 नवीन रूग्णांची भर पडल्याने एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी शंभरी गाठली. ग्रामीण भागासाठी आता धोक्याची घंटा ठरू शकते.
पुणे जिल्ह्यात सुरूवातीला काही दिवस कोरोना विषाणूची लागण केवळ शहरी भागा पर्यंत मयार्दीत होती. परंतु दिल्ली प्रकरणानंतर कोरोनाची लागण ग्रामीण भागात देखील पोहचली. गेल्या 70 दिवसा पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या एक वरून थेट 4 हजार 18 वर जाऊन पोहचली आहे. तर आता पर्यंत एकूण मृत्यू 206 ऐवढे झाले आहेत.
------
पुणे शहरात रविवारी 201 कोरोनाबधित रुग्णाची वाढ..
पुणे : शहरातील कोरोना संशयित व्यक्तींच्या तपासणीचे प्रमाण वाढविल्यामुळे, कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालापैकी 201 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शहरातील कोरोनाबाधित ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 1 हजार 551 एवढी झाली आहे.
दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्या रुग्णाची संख्याही काही दिवसांपासून लक्षणीय रित्या वाढली आहे. आज 53 जणांना घरी सोडण्यात आले असून, आजपर्यंत कोरोनामुक्त होण्याची शहरातील रुग्ण संख्या 1 हजार 751 एवढी झाली आहे. आज दिवसभरात विविध रुग्णालयातील 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 194 झाली आहे.
एकूण बाधित रूग्ण : 4018
पुणे शहर : 3517
पिंपरी चिंचवड : 199
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 302
मृत्यु : 206
घरी सोडलेले : 2014