Corona virus : पुणे शहरात दिवसभरात २६६ रूग्णांची वाढ; एकूण रूग्णसंख्या ६ हजार ७९५ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 08:48 PM2020-06-02T20:48:38+5:302020-06-02T20:49:06+5:30
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६५ जणांची प्रकृती चिंताजनक
पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा एकूण आकडा ६ हजार ७९५ वर जाऊन पोचला असून मंगळवारी दिवसभरात २६६ रूग्णांची नोंद करण्यात आली. दिवसभरात बरे झालेल्या १६९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १६५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ३३१ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मंगळवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २६६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२६ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात मंगळवारी २५ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३४५ झाली असून यामध्ये ग्रामीणमधील एकाचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १६९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १२८ रुग्ण, ससूनमधील ०२ तर खासगी रुग्णालयांमधील ३९ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ११९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ३३१ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १५४३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५२ हजार ४६० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १६१६, ससून रुग्णालयात १५१ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५६४ रुग्ण उपचार घेत आहेत.