Corona virus : धनकवडी परिसरात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना प्रशासन मात्र ढिम्म
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:49 PM2020-04-23T12:49:43+5:302020-04-23T12:56:43+5:30
धनकवडीत कोरोनाबाधितांची संख्या सात वर
पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. महापालिका, पोलीस, आरोग्य विभाग आणि प्रशासन यांच्याकडून विविध पावले उचलली जात आहे.मात्र,धनकवडी परिसरात अजूनसुध्दा उपाययोजना आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून कडक अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण आहे.
धनकवडी गावठाणात कोरोना बाधित पहिला रूग्ण सापडून दहा दिवसांचा कालावधी उलटला आणि पाठोपाठ ती संख्या सात वर जाऊन पोचली आहे. तरीही प्रशासनात सक्रियतेचा अभाव आढळला आहे. धनकवडी, भारती विद्यापीठ परिसरात गल्लोगल्ली, चौकात आणि रस्तोरस्ती भाजी विक्रेत्यांनी तर अच्छाद मांडला होता. भाजी विक्रेत्यांची अचानक वाढलेली संख्या आणि सोशल डिस्टस्निंगचा उडालेला फज्जा या आठवडा भरातील बेशिस्तीचा धोका कोरोना सक्रमणाला कारणीभूत ठरेल यांचाही विचार प्रशासनाकडून झाला नाही. कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडला तो भाग सील करणे, हाय रिस्क संपकार्तील कुटुंबियांना तपासणीसाठी नेणे, रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांची यादी करणे त्यांना शोधून विलगीकरण करणे आदी उपाययोजना होताना दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे.
सर्दी खोकल्याने त्रस्त एका रूग्णाची माहिती जबाबदार नागरिकांनी दिल्यानंतर क्षेत्रीय कार्यालय जागे झाले होते. त्यानंतर तो रूग्ण कोरोना बाधित निघाल्याचेही समोर आले आहे. या वातावरणात प्रशासनाची उदासिनता धनकवडीकरांसाठी धोकादायक ठरू नये यासाठी अनेक सामाजिक संस्था,मंडळांनी एकत्र येवून अधिकारी, पोलिस आणि लोकप्रतिनिधींना उपाययोजना वेगाने व्हाव्यात अशी विनंती केली होती. मात्र, प्रशासन, स्थानिक प्रतिनिधींनी फक्त आश्वासने दिली आणि प्रत्यक्ष कृती शून्यच राहिली त्यामुळ्े कोरोना बाधितांची संख्या वाढत असूनही नागरिकांची चिंता वाढवत आहे.
कोरोनाचा एक रूग्ण सापडला तरी ज्या वेगाने प्रशासन ईतरत्र उपाययोजना करते तीच उपाययोजना धनकवडीत झालेली नाही. जागतिक आरोग्य संघटने ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणीच होत नसल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत. सात रूग्ण सापडूनही प्रशासनाचा ढिसाळपणा कायम आहे.
सध्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे तो तीन मे पर्यंत असेल, मात्र पुण्यासह उपनगरांमधील सध्याची परिस्थिती पहाता तो वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. शहरातील मध्यभाग सील केला आहे. धनकवडीमधील सुद्धा कोरोना बाधित भाग सील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 'अत्यावश्यक' गोष्टींसाठी दोन तास दिलेत. पण या दोन तासांत नागरिक लॉकडाऊनची वाट लावत आहे.