Corona Virus : 'जम्बो कोविड सेंटर'चे पुन्हा होणार स्ट्रक्चरल ऑडिट; जूनमध्ये संपणार तीन महिन्यांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:31 PM2021-05-12T20:31:21+5:302021-05-12T20:32:18+5:30
आयआयटी दिल्लीने जम्बोच्या सांगाड्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर तीन महिन्यांच्या सुस्थितीचे प्रमाणपत्र दिले होते.
पुणे : शहरातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्यानंतर २२ मार्च रोजी जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी जम्बोच्या सांगाड्याचे दिल्ली आयआयटीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले होते. त्यांनी तीन महिन्यांची मुदत दिलेली होती. ही मुदत जून महिन्यात संपते आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पुन्हा एकदा जम्बोचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.
शहरातील रुग्ण कमी झाल्याने १५ जानेवारी रोजी जम्बो बंद करण्यात आले होते. दिल्ली आयआयटीने सांगाड्याचे सुस्थितीविषयक प्रमाणपत्र दिल्यानंतर २२ मार्चपासून प्रत्यक्ष रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात करण्यात आली. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्यानंतर जम्बोमुळे दिलासा मिळाला. रुग्णालयाची क्षमता ७०० खाटांपर्यंत वाढविण्यात आली. यापूर्वी महापालिका, पीएआरडीए आणि जिल्हाप्रशासनाच्या सहभागातून जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत जम्बोचे पूर्ण व्यवस्थापन महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले.
आयआयटी दिल्लीने जम्बोच्या सांगाड्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर तीन महिन्यांच्या सुस्थितीचे प्रमाणपत्र दिले होते. हे प्रमाणपत्र जूनपर्यंतचे असल्याने पुन्हा ऑडिट करून घ्यावे लागणार आहे. सांगाड्याची क्षमता नसेल तर ऐन पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यावेळीही जम्बोची आवश्यकता भासणारच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा हे ऑडिट केले जाणार असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला।हे काम सोपविले जाण्याची शक्यता आहे.
-------
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जर जम्बोचा सांगाडा कमकुवत झाल्याचे आणि तो उतरवण्याची आवशक्यता निष्पन्न झालेच तर ७०० रुग्णांना हलवायचे कुठे असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे पालिकेला 'प्लान बी' तयार ठेवावा लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासन विचार करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.