Corona virus : 'जम्बो' तुन थेट रुग्णानेच खुशालीचा व्हिडिओ कॉल केला ; कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 11:36 AM2020-09-10T11:36:39+5:302020-09-10T11:36:58+5:30
जम्बो रुग्णालयामधून २३ रुग्णांनी साधला नातेवाईकांशी संवाद
पुणे : कोरोनाग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मधून बुधवारी दिवसभरात २३ रुग्णांनी व्हिडीओ कॉलिंग सुविधेद्वारे आपल्या नातेवाईकांसोबत संवाद साधला. तर, दिवसभरात २० रुग्ण बरे होऊन घरी परतले.
जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या दिवसापासून सुरु झालेल्या असुविधेमध्ये पालिकेने रुग्णालयाचा ताबा घेतल्यापासून सुधारणा दिसू लागल्या आहेत. याठिकाणी नेमण्यात आलेल्या मेडिब्रो एजन्सीद्वारे मागील काही दिवसांपासून काम सुरु आहे. पालिकेनेही त्यांच्याकडील मनुष्यबळ याठिकाणी तैनात केले आहे. यासोबतच देखरेखीसाठी आणि कामकाजातील सुधारणेसाठी सहा अधिका-यांची समन्वय समितीही गठीत करण्यात आली आहे.
रुग्णांना दिवसामधून पाच वेळा जेवण दिले जात असून नातेवाईकांना रुग्णांची माहिती मिळावी याकरिता मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. यासोबतच रुग्णांना थेट नातेवाईकांशी बोलता यावे आणि त्यांची सद्यस्थिती कळावी याकरिता व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात व्हिडीओ कॉलिंगद्वारे 23 रुग्णांनी आपल्या नातेवाईकांशी संवाद साधला. यासोबतच उपचार घेऊन बरे झालेल्या २० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
याठिकाणी पालिका आणि मेडिकल एजन्सीचे एकत्रित ६० डॉक्टर आणि १५० वैद्यकीय कर्मचारी काम करीत आहेत. याठिकाणी २४ तास डॉक्टरांच्या टीम कार्यरत असून रुग्णांना कसलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात असल्याचे पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
रुग्णांना पाचवेळा जेवण रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी मागील आठवड्याभरात आल्या. त्यामुळे पालिकेने आता जम्बो रुग्णालयामध्ये दिवसामधून पाच वेळा जेवण देण्यास सुरुवात केली आहे. हे जेवण दर्जेदार असावे आणि त्यामधून पोषणतत्व मिळावीत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. जम्बोच्या प्रवेशद्वारावर नेमण्यात आलेले बाऊन्सर हटविण्यात आले आहेत. नातेवाईकां ना दिवसातून तीन वेळा रुग्णांची माहिती दिली जात असल्याने तक्रारी आणि वादाचे प्रसंग कमी झाले आहेत.