Corona virus : ‘हाय रिस्क’ नागरिकांची नोंद करण्यास मनुष्यबळाची कमतरता; किमान दोन हजार कर्मचाऱ्यांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:49 PM2020-06-20T12:49:33+5:302020-06-20T13:12:54+5:30
संपूर्ण शहरातील ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची नोंद करावयाची झाल्यास किमान दोन हजार मनुष्यबळाची गरज आरोग्य विभागाला आहे.
निलेश राऊत-
पुणे : शहरातील ‘हाय रिस्क’ नागरिकांची नोंद करण्यास पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अद्यापही सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये श्रीगणेशा झालेला नाही. त्यातच विविध कारणे देणारे शिक्षक या कामी नकोच म्हणून आरोग्य खात्यानेही त्यांनाही हात जोडले आहेत. त्यामुळे उपलब्ध नर्सेस, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फतच हे काम करावे लागणार आहे.
दरम्यान या ‘हाय रिस्क’ नागरिकांची नोंदणीच्या कामाला मोबाईल अॅपचे (वयश्री अॅप) मोठे दुखणे निर्माण झाले आहे. कारण सर्वच अंगणवाडी व आशा वर्कर्स यांच्याकडे अॅनरॉईड मोबाईल नाही, मग हा अॅप डाऊनलोड करून ही नोंदणी करायची कशी असा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्यातच आता ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने ज्यांच्याकडे अॅनरॉईड मोबाईल आहेत, त्यांना ते मुलाकरिता घरी ठेवावे लागत असल्याचेही काही सेविकांनी सांगितले आहे.
कोरोनाचा (कोविड-१९) चा सर्वाधिक संसर्ग हा अन्य व्याधींनी (आजारांनी) ग्रस्त असलेल्या नागरिकानांच होत असल्याने, राज्य शासनाने 'हाय रिस्क' नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना केल्या आहेत. तत्पूर्वी आरोग्य विभागाकडे १६ मार्चपासून सुरू झालेल्या सर्व्हेक्षणात १ लाख २५ हजार ७८४ अन्य आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिकांची नोंद पालिकेकडे उपलब्ध होती.
या नोंदी अपडेट करणे व नव्याने नोंदणी करण्यासाठी पालिकेने ६ जूनपासून काम हाती घेतले. पण १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचे कारण देत, या कामी रूजू असलेल्या सुमारे १ हजार ९०० शिक्षकांनी आम्हाला यातून मुक्त करा असा तगादा लावला. तर अनेक शिक्षक संघटनांनीही याबाबत पत्रव्यवहार केला. त्यामुळे आरोग्य विभागानेही त्यांना रामराम करून, पुढील सर्वेक्षणाची भिस्त एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे वळविली आहे. या कार्यालयाकडून सद्यस्थितीला १५५ अंगणवाडी सेविका उपलब्ध झाल्या असून, पालिकेला ७०० हून अधिक मनुष्यबळ तेथून मिळेल अशी अपेक्षा आहेत.
सद्यस्थितीला ९० आशा वर्कर्स, १५५ अंगणवाडी सेविका व पालिकेच्या काही नर्सेस अशा तुटपुंज्या मनुष्यबळावर शहरातील ७३ कंटन्मेंट झोनमध्ये हे काम सुरू झाले असले तरी, संपूर्ण शहरातील ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची नोंद करावयाची झाल्यास किमान दोन हजार मनुष्यबळाची गरज आरोग्य विभागाला आहे. सद्या ज्या नोंदी घेतल्या जात आहेत, त्या पालिकेने दिलेल्या फॉर्मवर लिखित स्वरूपात होत असून, त्या एकत्र करून नंतर हा 'डेटा वयश्री' या अॅपवर घेण्याचे काम करण्यात येणार आहे.
------------------
‘हाय रिस्क’ नागरिकांच्या नोंदी करण्यासाठी नियुक्त केलेल्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांना अतिरिक्त मानधन दिले जाणार आहे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून, या सेविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेला ५० लाख विम्याचे कवच व अन्य सुविधाही दिल्या जाणार आहेत.
रूबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा.
-------------------
आरोग्य विभागाने आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण दिले आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून या नोंदी होणार आहेत. नवीन यंत्रणा असल्याने प्रारंभी अडचणी येत असल्या तरी, रोजच्या वापरातून त्या दूर होतील. या कामामुळे अंगणवाडी सेविकांनाही अतिरिक्त उपत्नाचे साधण लॉकडाऊनच्या काळात निर्माण होत असून, शहरातील सर्व ज्येष्ठ व अन्य आजार असलेल्या नागरिकांची नोंद लवकरच पालिकेच्या यंत्रणेकडे असेल.
डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख.
---------------
ढोल पाटील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सध्या ८ हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराच्या व्यक्तींच्या नोंदी घेण्यात आल्या असून, ही एकत्रित माहिती मोबाईल अॅपवर घेण्याचे काम सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात सेविकांमार्फत या नोंदी थेट अॅपवर घेतल्यास प्रत्येक नोंदणीस साधारणत: १५ ते २० मिनिटे लागतात. त्यामुळे प्रत्येक सेविकेस प्रती घरामागे अतिरिक्त दोन रुपये मानधन दिले जाणार असले तरी, यातून या सेविकांना दिवसाला किती उत्पन्न मिळेल हाही एक मोठा प्रश्न आहे.
-----------------