Corona virus : अनेक रुग्ण ठणठणीत, तुम्हीच काळजी घ्या..!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:11 PM2020-04-13T22:11:44+5:302020-04-13T22:27:00+5:30
अमेरिका, इटली या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना बाधित रुग्ण तसेच मृतांचा आकडा नियंत्रणात
पुणे : शहरातील विविध रुग्णालयात दाखल असलेल्या २०२ रुग्णांपैकी केवळ सहा रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर एकुण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच सध्या उपचार घेत असलेले अनेक रुग्णही ठणठणीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाचा संसर्ग होऊ न देण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे.
अमेरिका, इटली या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना बाधित रुग्ण तसेच मृतांचा आकडा नियंत्रणात असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे. पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत आढळून येत असलेल्या रुग्णांची संख्याही कमी आहे. शासनाने योग्यवेळी घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे हे शक्य झाले आहे. सध्या पुणे शहरामध्ये नायडू व अन्य रुग्णालयांमध्ये १५१ तर ससून रुग्णालयात ५१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी केवळ ६ रुग्ण अत्यवस्थ असून ५ रुग्ण ससून रग्णालयात व्हेंटिलेटरवर आहेत. तर १० रुग्णांना श्वसनाला त्रास होत असल्याने आॅक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत अत्यवस्थ असलेल्या रुग्णांपैकी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये यापुर्वी कोणता ना कोणाता आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे. त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने कोरोनाशी त्यांचा लढा अयशस्वी ठरला. पण प्रतिकारशक्ती चांगले असलेले, कोणताही आजार नसलेले ज्येष्ठ, तरूण-तरूणी, लहान मुले कोरोनाला हरवत आहेत.
पुणे शहरात पहिले कोरोनाबाधित दोन रुग्ण दि. ९ मार्च रोजी आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील दोघांना लागण झाली. ते सर्वजण १४ दिवसांनी सुखरुपपणे घरी परतले. त्यानंतर दाखल झालेले रुग्ण १४ दिवसांच्या टप्प्यानंतर घरी परतत आहेत. एका खासगी रुग्णालयात बरेच दिवस व्हेंटिलेटरवर असलेली महिलाही उपचारानंतर घरी गेली. आतापर्यंत नायडू रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयांतून एकुण २७ रुग्ण कोरोनाला हरवून घरी गेले आहेत. तरीही त्यांना दक्षता म्हणून पुढील १४ दिवस होम क्वारंटाईनच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर काही रुग्णांना अत्यंत सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. काही रुग्णांमधील लक्षणे तीव्र असली तरी त्यांची तब्बेत ठीक आहे. त्यांच्यावर लक्षणांनुसार औषधोपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी सांगितले.
---------------
सध्या नायडू रुग्णालयामध्ये उपचार घेतलेल्या एकुण रुग्णांमध्ये १० ते १२ कुटूंबातील लोक आहेत. प्रत्येक कुटुंबातील ३ ते पाच रुग्ण आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील काही शेजारील लोकांचाही समावेश आहे. त्यामुळे रुग्णांचे क्लस्टर तयार झाले आहे, असे आरोग्य अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी काळजी न घेतल्यास पहिला संसर्ग आपल्या कुटंूबातील सदस्यांना होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले.
------------
ससून रुग्णालयातील स्थिती -
एकुण रुग्ण - ७६
सध्या रुग्ण - ५१
व्हेंटिलेटरवर - ५
आॅक्सिजनची गरज - १०
एकुण मृत्यु - २५
--------------------
नायडू व अन्य रुग्णालयातील स्थिती -
एकुण रुग्ण - २०२
सध्या उपचार सुरू - १५१
व्हेंटिलेटर - १
घरी परतले - २७
एकुण मृत्यु - ८
---------------------
पुण्यातील रुग्णांची एकुण स्थिती -
एकुण रुग्ण - २७८
एकुण अत्यवस्थ - ६
घरी परतले - २७
एकुण मृत्यू - ३३
----------------