Corona virus : कोरोना रुग्णांची दिशाभूल: व्हेंटिलेटरचा आकडा फसवा, तुटवडा कृत्रिम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 11:08 AM2020-09-08T11:08:24+5:302020-09-08T11:08:47+5:30
विविध रुग्णालयातील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या डॅशबोर्डवरील माहिती फसवा असल्याची धक्कादायक बाब समोर...
राजानंद मोरे
पुणे : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डवरील उपलब्ध व्हेंटिलेटरचा आकडा फसवा असून व्हेंटिलेटरचा तुटवडा कृत्रिम असल्याचे समोर आले आहे. डॅशबोर्डवर दोन दिवसांपर्यंत ससूनमध्ये १२३ व्हेंटिलेटरपैकी एकही व्हेंटिलेटर रिकामा नसल्याचे दाखविण्यात येत होते. पण प्रत्यक्षात रुग्णालयात तेवढे रुग्ण व्हेंटिलेटरवर नव्हते. त्यामुळेच दोन दिवसांपुर्वीच रुग्णालयातून सुमारे ४० व्हेंटिलेटर जम्बो रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
विविध रुग्णालयातील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने डॅशबोर्ड तयार केला आहे. त्यावर दिवसातून २-३ वेळा माहिती अद्ययावत केली जाते. त्यावरील माहितीनुसार आयसीयु, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचे दिसून येते. महापालिकेकडूनही दररोजच्या अहवालात याच माहितीचा समावेश केला जातो. त्यामुळे व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. व्हेंटिलेटर न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या तक्रारी नातेवाईकांकडून केल्या जात आहेत. पण प्रत्यक्षात व्हेंटिलेटरचा तुटवडा कृत्रिम असल्याची बाब समोर आली आहे.
ससून रुग्णालयामध्ये टप्प्याटप्याने १२३ व्हेंटिलेटर वाढविण्यात आले. दोन दिवसांपर्यंत डॅशबोर्ड रुग्णालयात १२३ व्हेंटिलेटर दाखविण्यात येत होते. तसेच १२३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे रुग्णालयाच्या अहवालात दाखविण्यात येत होते. पण रविवार (दि. ७) पासून व्हेंटिलेटर व रुग्णांची संख्या ७० पर्यंत खाली आहे. डॅशबोर्डसह रुग्णालयाच्या अहवालातच ही माहिती देण्यात आली. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रुग्णालयात १२३ व्हेंटिलेटर असले तरी तेवढे रुग्ण व्हेंटिलेटरवर नसतात. आयसीयुमधील काही रुग्णांना अचानक व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. त्यांच्यासाठी काही व्हेंटिलेटर ठेवावे लागतात. असे सुमारे ४० हून अधिक व्हेंटिलेटर आपत्कालीनसाठी ठेवण्यात आले होते. सध्याही ७० व्हेंटिलेटर असले तरी तेवढे रुग्ण नाहीत.’
-------------
ससूनमध्ये गंभीर रुग्णांची संख्या अधिक आहे. अनेक रुग्णांना अचानक व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. त्यामुळे काही व्हेंटिलेटर अतिरिक्त ठेवावे लागतात. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णसंख्या १२३ नव्हती. अतिरिक्त असलेले ४० व्हेंटिलेटर जम्बोला देण्यात आले आहेत. त्यामुळे ससूनमधील व्हेंटिलेटरची संख्या कमी झाली आहे.
- एस. चोकलिंगम, प्रशासकीय अधिकारी, ससुन रुग्णालय
--------------
ससूनमधील रुग्णांची स्थिती (डॅशबोर्ड)
दिवस एकुण रुग्ण ven. icu oxgen
५ सप्टेंबर ५४७ ४१९ ७ १२३
६ सप्टेंबर. ५४७ ४१९ ५८ ७०
----------------------------
ससून रुग्णालय अहवाल
दिवस एकुण रुग्ण गंभीर व्हेंटि.असलेले
५ सप्टेंबर ५४७ १२३ ४६
६ सप्टेंबर ५४७ ७० १०६
७ सप्टेंबर ५४७ ७० १२१
-------------------------