Corona virus : कोरोनावर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील आमदार, खासदारांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 04:17 PM2020-04-03T16:17:28+5:302020-04-03T16:19:26+5:30
खासदारांकडून प्रत्येकी एक कोटी तर आमदारांकडून प्रत्येक 50 लाखांचा निधी
पुणे: पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणा भविष्यात कमी पडण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी खासदारांनी प्रत्येकी एक कोटी तर आमदारांनी प्रत्येकी 50 लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी दिला आहे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील पहिला कोरोना बाधित रूग्ण पुण्यात सापडला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने अत्यंत कडक धोरण घेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नही सुरू केले. परंतु शासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर शहरांसह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील खासदारांनी आपल्या विकास निधी मधून आरोग्य विभागासाठी प्रत्येकी एक कोटी रूपयांचा निधी दिला आहे. तर जिल्ह्यातील 21 आमदारांपैकी आता पर्यंत 15 ते 16 आमदारांनी आपल्या विकास निधी मधून प्रत्येकी 50 लाख रूपयांचा निधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.