Corona virus : तीर्थक्षेत्र अलंकापुरी : 'देऊळबंद' ने दोनशेहून अधिक कुटुंबांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 11:27 AM2020-09-08T11:27:22+5:302020-09-08T11:29:32+5:30

कोरोनामुळे गेले चार ते पाच महिन्यांपासून ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर बंद आहे.

Corona virus : More than 200 families in problem due to temple closed in alandi | Corona virus : तीर्थक्षेत्र अलंकापुरी : 'देऊळबंद' ने दोनशेहून अधिक कुटुंबांवर उपासमारीची वेळ

Corona virus : तीर्थक्षेत्र अलंकापुरी : 'देऊळबंद' ने दोनशेहून अधिक कुटुंबांवर उपासमारीची वेळ

Next
ठळक मुद्देफुल व प्रसाद विक्रेते आर्थिक अडचणीत

भानुदास पऱ्हाड

आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊलींचे संजीवन समाधी मंदिर मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. परिणामी स्थानिक पान - फुले, हार, प्रसाद विक्रीचा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या दोनशेहून अधिक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान शासनाने मंदिरे खुली करण्यासंदर्भात परवानगी देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने घंटानाद आंदोलन केले होते. मात्र भाजपच्या या आंदोलनानंतरही मंदिरे खुली करण्यासंदर्भातचा निर्णय शासनदरबारी प्रलंबित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 
      माऊलींचे संजीवन समाधी मंदिर आळंदी शहराचा आर्थिक कणा आहे. मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. मात्र मंदिरासमोर पान - फुले, प्रसाद, पेढे, खेळणी विकून उदरनिर्वाह करणाऱ्यांसाठी तो श्रद्धेबरोबर पोटापाण्याचा देखील विषय आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने लॉकडाऊन घोषित करून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरे बंद ठेवली आहेत. सध्या 'लॉकडाऊन' संपून "अनलॉकचा" चौथा टप्पा सुरू आहे. मात्र बंदची दाहकता अद्यापही कायम आहे. 
       शासनाच्या आदेशानुसार सुमारे सहा महिन्यांपूर्वी माऊलींच्या मंदिरासमोरील महाद्वाराला टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे संजीवन समाधी मंदिर परिसरातील पानं - फुलं, प्रसाद, हार, खेळणी, तुळशीच्या माळा आदी वस्तू विक्रेत्यांची अंदाजे दोनशेहून अधिक दुकानेही बंद झाली. परंतु सद्यस्थितीत अशा अनेक कुटूंबांचा व्यवसाय बंद असल्याने एक नवा पैसा देखील त्यांच्या घरात येत नसल्याने या व्यावसायिकांचे जगणेच मुश्किल झाले आहे. 
       अनेकांनी या छोट्याश्या व्यवसावर कर्ज उचलली असून त्याचे हफ्ते देखील भरता येत नाही. त्यात काहींनी भिशी, चक्रवाढ व्याजाने टक्केवारीवर पैसे उचलले असल्याने त्यांच्या समोर तर पैशाचा प्रश्न आ वासून उभा आहे. काहींना रोजच्या गरजा भागविताना देखील अडचणी येत आहेत. उसनंवारी करून त्यांची गुजरान सुरू आहे. मंदिरे सुरू होण्याबाबत अजून कसलाच संकेत मिळत नसल्याने व्यावसायिक हतबल झाले असून अनेकांनी इतर ठिकाणी कंपनीमध्ये निम्म्या पगारात नोकऱ्या स्वीकारल्या आहेत. अशा स्थितीत इतर खर्च वाढत चालला असून उत्पन्न मात्र शून्य झाले आहे. त्यामुळे सरकारने मंदीर खुले करण्यासंदर्भात मार्ग काढावा अशी अपेक्षा दुकान व्यावसायिकांकडून व्यक्त केली होत आहे.
............
शहराची अर्थव्यवस्था येथील माऊलींच्या मंदिरावर अवलंबून आहे. मात्र  मंदिर बंद असल्याने येथे जवळ-जवळ सहा महिन्यांपासून भाविक येत नाहीत. परिणामी येथील बहुतांशी छोटे मोठे व्यावसायिक - व्यापारी, शेतकरी, फुले, हार, तुळशीच्या माळा, नारळ, मूर्ती, पुस्तके, खेळणी, टाळ - मृदुंग आदी व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने काही अटी व शर्तींवर मंदिर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी विक्रेत्यांकडून केली जात आहे.
..........

एकीकडे मंदिर बंद असल्याने मंदीरालगतच्या संबंधित दुकान व्यावसायिकांचा रोजगार बुडत असल्याने मंदिर उघडण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे आळंदी शहर व परिसरातील सर्वच गावांमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नित्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याची सत्यास्थिती आहे. त्यामुळे मंदिर खुले करणे व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर असले तरीसुद्धा स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता धोकादायक आहे.

" शासन आदेशानुसार १८ मार्चपासून देऊळ बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही दुकानही बंद ठेवली आहेत. मात्र मंदिर बंद असल्याने आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच दुकानांवरील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बीजवारी तसेच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दुकानांत भरलेले माल वाया गेले. नाशवंत पदार्थांचे नुकसान झाले. प्रशासनाने अटी - शर्तींवर मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी.
 ज्ञानेश्वर गुळुंजकर, अध्यक्ष, व्यापारी तरुण मंडळ

" मागील सहा महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने लगतच्या सर्व व्यावसायिकांचे आर्थिक समीकरण खिळखिळे झाले आहे. महिन्याचे साधारण ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून आजपर्यंत सरासरी दोन लाख रुपयांचा व्यवसाय वाया गेला आहे. येथील फुलांच्या दुकानांवर अवलंबून असलेले शेतकरी तसेच कारागिरांचेही मोठे नुकसान होत आहे. 
          - योगेश आरु, विक्रेते आळंदी.

" शासनाच्या आदेशानुसार आजपर्यंत मंदिर बंद आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तात्काळ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येईल. 
            - माऊली वीर, व्यवस्थापक देवस्थान कमिटी.

Web Title: Corona virus : More than 200 families in problem due to temple closed in alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.