Corona virus : पुण्यातील बहुतांश खासगी प्रयोगशाळांचा ‘होम सॅम्पल कलेक्शन’वरच भर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:57 PM2020-09-17T12:57:51+5:302020-09-17T13:00:46+5:30
लॅबमध्ये जाऊन चाचणी केल्यास १२०० ऐवजी १६०० रुपये
डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य नको, नागरिकांची मागणी
पुणे : पुण्यातील काही प्रयोगशाळा लॅबमधील कोरोना चाचणीसाठी १६०० रुपये आकारत आहेत. बहुतांश प्रयोगशाळांनी कलेक्शन सेंटर बंद करुन केवळ घरी जाऊन नमुना संकलन करण्याचा पर्यायच खुला ठेवला आहे. मात्र, चाचणीसाठी अजूनही डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य आहे. प्रशासनाला एकीकडे ट्रेसिंग वाढवायचे असताना डॉक्टरांच्या चिठ्ठीची अट शिथिल करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शासनाने ८ सप्टेंबरपासून कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये ६०० ते ८०० रुपयांची कपात केली. लॅबमध्ये जाऊन चाचणी केल्यास १२०० रुपये, हॉस्पिटलमध्ये किंवा कोव्हिड केअर सेंटरमध्ये चाचणीसाठी १६०० रुपये आणि रुग्णाच्या घरी चाचणी झाल्यास २००० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. ‘होम कलेक्शन’साठी शासनाच्या दरपत्रकानुसार रक्कम आकारली जात आहे.
प्रयोगशाळेत जाऊन चाचणी केल्यास १२०० ऐवजी १६०० रुपये आकारले जात आहे. पीपीई किट, नमुना संकलनासाठी लागणारी उपकरणे इत्यादींवर जास्त खर्च होत असल्याचे कारण सांगितले जात आहे. तसेच, आधार कार्ड किंवा पासपोर्टची कॉपी असणे बंधनकारक आहे. बहुतांश नामांकित प्रयोगशाळांनी केवळ घरी जाऊन नमुना संकलनाचा पर्यायच खुला ठेवला आहे. मात्र, अपॉईनमेंट घेताना एबीबीएस डॉक्टरची चिठ्ठी असणे अनिवार्य आहे.
----------------------------
अनेक नागरिकांचा खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करुन घेण्याकडे कल असतो. मात्र, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय चाचणी करुन घेता येत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये दर दशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण ७५,३१२ इतके आहे. जिल्ह्यातील नमुना तपासणी संख्या देशामध्ये जास्त असून काही कालावधीसाठी अबाधित ठेवली जाणार आहे. माजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तपासण्या वाढवण्याच्या दृष्टीने डॉक्टरांच्या चिठ्ठीची अट दूर करण्याचे संकेत दिले होते. मात्र, राम यांची बदली झाल्यानंतर याबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. अट शिथिल केल्यास चाचण्यांची संख्याही वाढू शकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
----------------------
कोरोनाबाधित रुग्णांचे ‘ट्रेसिंग’ वाढवण्याचा दृष्टीने जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर जिल्ह्यात भर देण्यात येत आहे. एका दिवसात साधारणपणे १०,०००-१२,००० चाचण्या केल्या जात आहेत. खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची अट शिथिल करता येईल का, याबाबत चर्चा करुन त्याबाबत लवकरच सूचना दिल्या जातील.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी