Corona virus : कोरोना नियंत्रणासाठी पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’राबवा : आरोग्य मंत्री राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 06:48 PM2020-06-26T18:48:03+5:302020-06-26T18:57:39+5:30
जिल्ह्यात खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घ्या.
पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई शहराच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजना करण्याची गरज असून, पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’राबवा अशा सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.
कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून मुंबई शहराच्या धर्तीवर पुणे शहरासह जिल्ह्यात खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेऊन, त्या रुग्णालयात एक जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. संबंधित अधिकाऱ्याांनी कार्यालय व्यवस्थापनाच्या मदतीने एक फ्लोचार्ट करावा. त्यामध्ये रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी आयसीयूचे बेड, व्हेंटीलेटर बेडस, पीपीई कीट, मास्क इत्यादी बाबी नमूद कराव्यात. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ होईल. तसेच कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या शासकीय निदेर्शाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत उपचार करण्यास प्राधान्य द्यावे असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करतानाच, लोकांच्या मनात कोरोना विषाणू विषयीची भीती कमी करण्यासाठी सोशल मीडिया तसेच दूरचित्रवाणी, होर्डिग्ज, भिंतीपत्रके, रेडीओ यांचा वापर करून जनजागृती करावी. आज लहान बाळापासून ते वयोवृध्द आजीपर्यंत अनेकजण कोरोनामुक्त झाले आहेत. अशा व्यक्तींच्या अनुभवातून यशकथा तयार कराव्यात. कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती जास्तीत जास्त चाचणीद्वारे मिळणार आहे. त्यामुळे नागरिक हा केंद्रबिंदू मानून माणुसकी आणि मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी एकत्र येवून कोरोना विषाणूवर मात करावे, असे आवाहनही टोपे यांनी केले.