Corona virus : महापालिकेचे 'कोविड केअर सेंटर' कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी आशेचा किरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 03:14 PM2020-07-04T15:14:43+5:302020-07-04T15:38:55+5:30
समाजातील तळागाळातील व्यक्तीलाही कोरोना संसर्ग झाल्यास, उच्चप्रतीची सेवा मिळावी यासाठी पुणे महापालिकेचे ३२ ‘कोविड केअर सेंटर’ शहरात कार्यरत आहेत
नीलेश राऊत-
पुणे : सरकारी दवाखाना आणि तेथील व्यवस्था, राहण्याची अबाळ, जेवणाचा दर्जा, वेळेत उपचाराची भ्रांत आदी कारणास्त सरकारी दवाखाने नको रे बाबा ! अशी मानसिकता सर्वसामान्यांची झाली असतानाच, कोरोना आपत्तीच्या काळात पुणे महापालिकेच ‘कोविड केअर सेंटर’ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये हे सर्व समज दूर करणारे ठरले आहेत. उपचारासाठी दाखल होताना किंतु मनात ठेऊन या सेंटरमध्ये आलेले बहुतांशी रूग्ण जाताना मात्र, कोरोनामुक्त होऊन उत्तम सुविधांबद्दल पालिका यंत्रणेचे आभार मानतच या सेंटरला निरोप देत असल्याचे चित्र महापालिकेच्या निकमार 'कोविड केअर सेंटर' मध्ये पाहण्यास मिळाले.
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच काही खासगी हॉस्पिटलने आपले कोविड-१९ रूग्णांसाठीचे दरपत्रकच तयार केले. कमीत कमी ३० हजार व जास्तीत जास्त १ लाख रुपए डिपॉझिट भरल्याशिवाय या ठिकाणी प्रवेशच नसल्याचे चित्र शहरात आहे. परंतु, याच वेळी समाजातील तळागाळातील व्यक्तीलाही कोरोना संसर्ग झाल्यास, उच्चप्रतीची सेवा मिळावी यासाठी पुणे महापालिकेचे ३२ ‘कोविड केअर सेंटर’ शहरात कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी लक्षणे नसलेले अथवा सौम्य लक्षणे असलेले साधारणत: साडेचार हजार रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. यापैकी निकमार सेंटरमध्ये सद्यस्थितीला ६६५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
निकमार सेंटरची एकूण क्षमता ९६९ खाटांची असून, या ठिकाणी काही इमारतीमध्ये प्रत्येक खोलीत एक तर काही ठिकाणी दोन रूग्णांची सोय करण्यात आली आहे. स्वतंत्र बाथरूड, शौचालय, दोन खाटांमध्ये सुरक्षित अंतर असलेल्या या खोल्या रूग्णांना हॉटेलची आठवण करून देणाऱ्या आहेत. एकाच कुटुंबातील पॉझिटिव्ह रूग्ण असतील तर, ते या ठिकाणी शेजार-शेजारच्या खोल्यांमध्ये दहा दिवस उपचारसाठी दाखल करून घेण्यात येतात. सकाळचा चहा, नाष्टा, संध्याकाळी चहा, दोन वेळचे जेवण देण्यासाठी येथे स्वतंत्र किचन व्यवस्थाच करण्यात आली आहे. परिणामी वेळेवर जेवण येथील सर्व रूग्णांना मिळत असल्याने बहुतांशी रूग्ण या सेवेबाबत समाधानी असल्याचे चित्र ह्यलोकमतह्णच्या पाहणी दिसून आले.
आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत आणि उपचारासाठी दाखल झालो असल्याची भावना येथे कुठल्याही रूग्णामध्ये पाहण्यास मिळाली नाही. सकाळी वॉकिंगसाठी खोली बाहेर पडणे, सुरक्षित अंतर ठेऊन सायंकाळी खेळ खेळणे, इमारतीच्या पॅसेजमध्ये खुर्चा टाकून एकमेकांशी गप्पा मारणे, निकमारच्या पॅसेजमध्ये फेरफटका मारणे आदी गोष्टींमुळ येथे कोणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहे किंवा कुठलेही भीतीचे वातावरण दिसून येत नाही.
२४ तास येथे डॉक्टरांची एक टिम येथे कार्यरत असून, अन्य आजार असलेल्या अथवा वयस्कर रूग्णांस काही त्रास झाल्यास त्याला अन्यत्र म्हणजेच डेडिकेटेड कोविड सेंटरला हलविण्याची यंत्रणाही येथे उपलब्ध आहे. येथील पॉझिटिव्ह रूग्णांना त्यांच्या लक्षणानुसार औषधोपचार दिले जात असून, शासनाने निर्देशित केलेल्या एचसीक्यु औषधांची मात्राही त्यांना याठिकाणी दिली जात आहे. १० दिवसांच्या उपचारानंतर हे रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाताना महापालिकेच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करून सरकारी रूग्णालय हेही खाजगी रूग्णालयांच्या सेवेपेक्षा कमी नसल्याचा विश्वास मनात नक्की करून जात आहेत.