corona virus : कोरोना उद्रेकाच्या काळात मुस्लिमांनी टाळावा सामुदायिक नमाजाचा अट्टाहास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 06:27 PM2020-03-30T18:27:48+5:302020-03-30T18:32:34+5:30
काही मुस्लीम आडमूठेपणा करीत मशिदीत, इमारतीच्या गच्चीवर सामुदायिक नमाज पठण करत असल्याचे आले समोर
पुणे - काही मुल्ला, मौलाना, मौलवी यांनी पत्रके काढून मुस्लीम समाजाला शुक्रवारची नमाज आणि शब्बेबरात नमाज आपआपल्या घरी अदा करण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही काही मुस्लीम आडमूठेपणा करीत मशिदीत, इमारतीच्या गच्चीवर सामुदायिक नमाज पठण करत असल्याचे लक्षात आले आहे. मुस्लिमांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे, असे आवाहन कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केले आहे.
"सब कुछ अल्लाह के मर्जी से होगा, वह बचाने वाला है वगैरे वक्तव्य करुन मुस्लिमांना दुआ करायला सांगितले जात आहे. अंधश्रद्धाही पसरवल्या जात आहेत. अशा वर्तनामुळे काय हाहाकार माजणार आहे याचे गांभीर्य विचारात घेऊन मुस्लीमांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे. मुस्लीम बहुल वस्तीत सार्वजनिक शिस्तीचे कठोर पालन करण्याची गरज आहे. जग थांबले आहे आपणही थांबले पाहिजे, मंदिर बंद आहे, चर्च बंद आहे. मशिदीही बंद ठेवल्या पाहिजेत. देश आणि मानवतेसमोरील हे युध्द लढताना सर्वांसोबत मुस्लिमांनी सजग राहून सहकार्य करावे, असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केले आहे.
मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आज जगात कोरोना विषाणूचे थैमान घातले आहे. हजारोंच्या संख्येने लोक मृत्युमूखी पडत आहेत. शासन-प्रशासन यंत्रणा सर्व स्तरावर सर्व शक्तीनिशी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतानाही हतबल झाले आहेत. अनेक मुस्लीम देश सर्व प्रकारच्या सामुदायिक प्रार्थना, धार्मिक सण, जुम्माचा नमाज मस्जिद मध्ये अदा न करता आपआपल्या घरी अदा करण्याचा उपदेश करीत आहेत. पंतप्रधान आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार आवाहन करुन मंदिर, मशीद, दर्गा, चर्च, विहार, गुरुद्वारा व इतर धार्मिक स्थळे बंद ठेवावीत असे आदेश दिले आहेत. लोकांनी आपआपल्या घरात थांबून स्वत:ची काळजी घ्यावी असे निर्देश दिले आहेत. या भयावह वातावरणात आरोग्य, प्रशासन, पोलीस क्षेत्रातील अधिकारी - कर्मचारी जीवाची बाजी लावून ही महामारी रोखण्यासाठी तसेच रुग्णावर उपचार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मुस्लीमांनीही स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे.
------------------------