Corona virus : कोरोना विषाणूंपासून स्वत:च्या बचावासाठी नायडू रुग्णालयातील डॉक्टर 'अशी ' घेतात काळजी..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 02:01 PM2020-04-02T14:01:53+5:302020-04-02T14:02:03+5:30
कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाच या विषाणूने गाठल्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी घडल्या आहेत...
पुणे : सगळे जग कोरोना विषाणूंपासून दूर राहण्याची काळजी घेत असताना महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील अनेक डॉक्टर, परिचारिकांना मात्र रोज याच विषाणूंच्या सान्निध्यात वावरावे लागते. कोरोनाबाधित आणि संशयितांवर उपचार करताना हा विषाणू स्वत:लाही गाठू शकतो, याची शक्यता गृहीत धरून त्यांना हे जोखमीचे काम करावे लागत आहे. त्यामुळेच कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सर्व शक्यता बाद करण्यासाठीच्या सर्व मार्गांचा अवलंब त्यांच्याकडून केला जात आहे.
कोरोना विषाणूसंदर्भातले उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाच या विषाणूने गाठल्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मंडळींकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या संदर्भातली माहिती त्यांनी दिली.
कोरोना रुग्ण आणि संशयितांच्या सान्निध्यात असणाऱ्यांचे कपडे, रुमाल आदी वस्तू इतर कोणालाही वापरू दिल्या जात नाहीत. विशेष पोशाख परिधान केल्याशिवाय रुग्णालयाच्या या कक्षात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. हा पोशाखही वारंवार निर्जंतुक केला जातो. रुग्णाच्या तपासणीसाठी डॉक्टर आणि परिचारिकेला दर एक तासाने जावेच लागते. या तपासणीनंतर लगेचच हात स्वच्छ धुतले जातात. ‘डॉ. नायडू रुग्णालयात काम करतो हे ज्यांना माहिती आहे, त्यांची आमच्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली आहे,’ असे मत एका डॉक्टरांनी व्यक्त केले. एरवी महापालिकेचे दवाखाने व तिथे काम करणारे डॉक्टर समाजातील एका विशिष्ट वर्गाकडून कायम टीकेचे लक्ष्य केले जातात. कोरोना या जागतिक आपत्तीच्या काळात मात्र हे रुग्णालय व तेथील डॉक्टर, परिचारिका आता मात्र देशवासियांच्या अभिमानाचा विषय झाले आहेत.
..............
रुग्णालयातले कामाचे तास संपल्यानंतर हे डॉक्टर आणि परिचारिका कधीही थेट घरात जात नाहीत. घरापासून दूर अंतरावर ते थांबतात. त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती त्यांच्यासमोर प्लॅस्टिकचे अथवा धातूचे एखादे भांडे ठेवते. त्यात हातातील घड्याळ, पेन, पट्टा, मोबाईल अशा वस्तू ठेवल्या जातात. त्यावर जंतुनाशक फवारले जाते. त्यानंतरही बराच काळ त्या वस्तू तशाच ठेवल्या जातात.
संबधित डॉक्टर आणि परिचारिकेच्या शरीरावरही जंतुनाशकाचा फवारा मारला जातो. यानंतर घरातल्या कोणत्याच वस्तूला, व्यक्तीला स्पर्श न करता ही मंडळी आंघोळीसाठी थेट स्नानगृहात जातात. आंघोळीपूर्वी सर्व कपडे साबणाच्या गरम पाण्यात भिजवले जातात. रोजच्या रोज कपडे बदलले जातात. रोज दोनदा गरम पाण्याने आंघोळ केली जाते. दर तासाला जंतुनाशकाने हात स्वच्छ केले जातात.