Corona virus : पुण्यातील ‘नायडू’ने करून दाखवलं! डॉक्टर,कर्मचारी यांपैकी एकही नाही कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 07:46 PM2020-04-18T19:46:58+5:302020-04-18T19:49:35+5:30

पहिल्या दिवसापासूनच डॉक्टरांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे योग्यप्रकारे प्रशिक्षण आणि सर्वप्रकारची दक्षता..

Corona virus : Naidu in Pune did it! No corona infection of the doctors, staff | Corona virus : पुण्यातील ‘नायडू’ने करून दाखवलं! डॉक्टर,कर्मचारी यांपैकी एकही नाही कोरोनाबाधित

Corona virus : पुण्यातील ‘नायडू’ने करून दाखवलं! डॉक्टर,कर्मचारी यांपैकी एकही नाही कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्देनायडू रुग्णालय हे पुणे महापालिकेचे संसर्गजन्य आजारांसाठीचे एकमेव रुग्णालयदररोज ६० ते  ७० पीपीई कीटचा वापरससूनसह पुण्यातील खासगी रुग्णालयांमधील परिचारिका व डॉक्टरांनाही कोरोनाचा विळखा

पुणे : ससूनसह पुण्यातील खासगी रुग्णालयांमधील परिचारिका व डॉक्टरांनाही कोरोनाने विळखा घातलेला असताना नायडू रुग्णालयाने मात्र कोरोनाचा शिरकाव होऊ दिलेला नाही. जवळपास दीड महिने होऊनही या रुग्णालयात काम करणाऱ्या एकालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. पहिल्या दिवसापासूनच डॉक्टरांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे योग्यप्रकारे प्रशिक्षण आणि सर्वप्रकारची दक्षता घेतली जात असल्याने सर्वजण सुरक्षित आहेत.
नायडू रुग्णालय हे पुणे महापालिकेचे संसर्गजन्य आजारांसाठीचे एकमेव रुग्णालय आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना संसर्गजन्य आजारांशी सामना करण्याचा अनुभव आहे. स्वाईन फ्लु आल्यानंतरही सध्या काम करणारे काही डॉक्टर व परिचारिका कार्यरत होत्या. पण कोरोनाचे संकट थोडे अधिक धोक्याचे असल्याने जास्त सतर्कता ठेवावी लागणार होती.

राज्यात कोरोनाचे वारे वाहू लागल्यानंतर सुरूवातीला पुण्यातील नायडू आणि मुंबईतील कस्तुरबा ही दोनच रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली होती. जानेवारी महिन्यापासूनच परदेशातून आलेल्या प्रवाशांची रीघ लागण्यास सुरूवात झाली होती. त्यांची तपासणी करून विलगीकरण कक्षात दाखल करणे, घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे काम सुरू होते. पण हे काम सुरू करण्यापुर्वी तपासणी करणारे तसेच विलगीकरण कक्षात जाणारे सर्व डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची संपुर्ण माहिती देण्यात आली. त्यासाठी पीपीई कीट घालताना, काढताना काय दक्षता घ्यायची, याचेही प्रशिक्षण दिले जात होते. राज्यातील पहिला रुग्ण ९ मार्च रोजी आढळून आल्यानंतर तर हे रुग्णालय हॉटस्पॉट बनले. नायडू म्हटले की लोकांना भिती वाटू लागली. पण तिथे काम करणारा प्रत्येक जण केवळ दक्षता घेत होता आणि आजही घेत आहेत.
नायडूमध्ये खासगी रुग्णालयांसारखीच स्वच्छता ठेवली जात आहे. पीपीई कीट तसेच इतर वैद्यकीय साहित्याची योग्यप्रकारे विल्हेवाट, डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेचीही काळजी घेतली जात आहे. सध्या तिथे एका शिफ्टमध्ये दररोज ५५ जण काम करतात. पण आतापर्यंत त्यातील एकालाही कोरोनाची संसर्ग झालेला नाही.
दुसरीकडे ससून रुग्णालयामध्ये दि. ३१ मार्चपासून रुग्ण दाखल होण्यास सुरूवात झाली. पण १५ दिवसांच्या आत तीन परिचारिकांना कोरोनाची लागण झाली. आता एक डॉक्टरही बाधित झाले आहेत. तसेच एका खासगी रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. काही दिवसांपासून ससूनमध्ये डॉक्टर व परिचारिकांची व्यवस्था हॉटेल, शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे. पण नायडूमधील बहुतेक जण घरूनच ये-जा करतात. त्यांच्या कुटूंबियांनाही कोरोनाचा धोका आहे. पण नायडू रुग्णालयामध्ये घेतल्या जात असलेल्या दक्षतेमुळेच सर्वजण कोणत्याही दडपणाशिवाय काम करत आहेत.
------------------
दररोज ६० ते  ७० पीपीई कीटचा वापर
नायडू रुग्णालयामध्ये सध्या जवळपास ८० रुग्ण असून आतापर्यंत शुक्रवारपर्यंत २९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. या रुग्णांवरील उपचार, स्वॅब घेणे, विलगीकरण कक्षाची स्वच्छता या कामांसाठी संबंधितांना पीपीई कीट घालूनच जावे लागते. सुरूवातीच्या दिवसात रुग्ण कमी असल्याने दररोज केवळ १० ते १५ कीट लागत होते. आता दररोज ६० ते ७० कीटचा वापर होत आहे. आतापर्यंत सुमारे दीड हजार कीट वापरण्यात आले आहेत.
----------
डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना कोरोनाविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षितेबाबत दक्षता घेतली जाते. प्रामुख्याने स्वच्छता, पीपीई कीटचा वापर यावर अधिक भर असतो. त्यांच्याकडूनही काळजी घेतली जात असल्याने अद्याप कोणालाही संसर्ग झालेला नाही.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी
-------------
आम्ही सुरक्षित राहिलो तर इतरांची सेवा करू शकू, या भावनेतून स्वत:ची काळजी घेत असतो. हे संसर्गजन्य रुग्णालय असल्याने सर्वांना दक्षता काय घ्यायची हे माहित आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवले आहेत. मास्कचा वापर बंधनकारक आहे. संशयित किंवा रुग्णांशी बोलताना, त्यांच्याकडील साहित्य हाताळताना दक्षता घेतली जाते.
- डॉ. नम्रता चंदनशिव, नायडू रुग्णालय

Web Title: Corona virus : Naidu in Pune did it! No corona infection of the doctors, staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.