Corona virus : धनकवडी - सहकारनगर परिसरात कोरोना रुग्ण एका महिन्यात सातपट; मृत्यू तिप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 02:49 PM2020-05-28T14:49:39+5:302020-05-28T15:06:07+5:30
धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावरील चिंतेची टांगती तलवार अजूनही कायम मृत्यू तिप्पट तर बरे झालेले रुग्ण निम्म्या पेक्षा जास्त
पांडुरंग मरगजे-
धनकवडी : धनकवडीसहकारनगर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत गेल्या एक महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सात पटीहून अधिक वाढ झाली असून मृत्यू झालेल्यांच्या संख्येत ही तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावरील चिंतेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. या भागात २१ मार्चला पहिला रुग्ण सापडल्यापासून गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्ण संख्येची आकडेवारी दोनशे चव्वेचाळीसपर्यंत पोहोचली आहे. मात्र यातील निम्म्या पेक्षा जास्त रुग्ण बरे होवून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ही बाब निश्चितच दिलासादायक आहे
उपनगरांमधील दत्तनगर आंबेगावमध्ये पहिला रुग्ण २१ मार्च रोजी आढळला होता. २१ एप्रिल अखेर ही संख्या ३१ होती तर सहा जणांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या काळात सहकारनगर आणि नंतर धनकवडीमधील काही भाग कंटेन्टमेंट झोन ठरले होते. मात्र नुकतीच धनकवडी मधील कंन्टेटमेंट झोन शिथील करण्यात आला आहे. तर सहकारनगर प्रभाग क्रमांक ३५ मधील वाढती रुग्ण संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. येथील लहान मोठ्या झोपडपट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
एकीकडे प्रभाग क्रमांक ३५ सहकारनगर, प्रभाग क्रमांक ३९ धनकवडी मधील कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतानाच दुसरी कडे कात्रज मध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र मे च्या पहिल्याच आठवड्यात प्रभाग क्रमांक ४० कात्रज मधील अंजनी नगर परिसरात एकाच दिवशी तीन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तब्बल दोन महिने सुरक्षित असलेल्या कात्रज भाग कोरोनाबाधित झाला. प्रशासन आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या उपाययोजनांमुळे कात्रजमध्ये अजूनही परिस्थिती आटोक्यात आहे. तर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक ४२ मध्ये सुद्धा रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. विशेषत: या दोन्ही (प्रभाग ४० व ४२ ) प्रभागामध्ये एकही कोरोना बाधितांचा मृत्यू झाला नाही.