Corona Virus News : दिलासादायक ! औंध-येरवडा-शिवाजीनगरमध्ये कोरोना रुग्णवाढीची टक्केवारी शून्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:55 PM2021-02-06T15:55:24+5:302021-02-06T15:55:54+5:30
उर्वरीत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अवघी एक टक्का वाढ
लक्ष्मण मोरे -
पुणे : शहरातील कोरोना रुग्णवाढीची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर खाली आली असून सरासरी एक टक्का वाढ मागील दोन आठवड्यात नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबरपर्यंत कोरोनामुळे हैराण झालेल्या नागरिकांना गेल्या दीड-दोन महिन्यात दिलासा मिळाला आहे. औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रस्ता आणि येरवडा-कळस-धानोरी या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये तर या आठवड्यात शून्य टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. कोरोनाची घटत चाललेली आकडेवारी पाहता पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
शहरात राज्यातील पहिला रुग्ण 9 मार्च 2020 आढळून आला होता. त्यानंतर झपाट्याने रुग्ण वाढत गेले. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ झाली. सप्टेंबरमध्ये 17 हजार 900 ची सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली होती. गणेशोत्सवानंतर ही वाढ झाली होती. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी त्याला दिलेला प्रतिसाद यामुळे रुग्ण संख्या कमी झाली. दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु, सुदैवाने अद्याप तरी तशी चिन्हे दिसत नाहीत.
पालिकेकडून दर आठवड्याला कोरोनाचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला जातो. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या 3 फेब्रुवारी रोजीच्या अहवालामध्ये मागील दोन आठवड्यातील ‘टेÑंड’ देण्यात आले आहेत. यामध्ये 21 जानेवारी 27 जानेवारी आणि 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या काळातील वाढ सरासरी एक टक्का नोंदविण्यात आली आहे. यातील तीन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत शून्य टक्के वाढीचा टेÑंड दिसतो आहे.
=====
28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यानची आकडेवारी
क्षेत्रीय कार्यालय - एकूण कोरोना रुग्ण - (टक्केवारी)
औंध बाणेर 75 0%
भवानी पेठ 37 1%
बिबवेवाडी 62 1%
धनकवडी-सहकारनगर 71 1%
ढोले पाटील 34 1%
हडपसर 121 1%
कसबा पेठ 61 1%
कोंढवा-येवलेवाडी 64 1%
कोथरुड-बावधन 86 1%
नगर रस्ता 124 1%
शिवानीगर-घोले रस्ता 48 0%
सिंहगड 105 1%
वानवडी 31 1%
वारजे-कर्वेनगर 83 1%
येरवडा-कळस-धानोरी 69 0%
महापालिका हद्दीबाहेर -- 0%
एकूण 1061 1% (सरासरी
======
क्षेत्रीय कार्यालयनिहाय तसेच शहर पातळीवरही कोरोना रुग्णांची टक्केवारी कमी होते आहे. या काळातही पालिकेकडून पुर्वीप्रमाणेच तपासण्या सुरु आहेत. त्याची संख्या कमी केलेली नाही. रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर खाटांची संख्या पुरेशी आहे. लोकांना वेळेत उपचार मिळत आहेत. प्रशासकीय पातळीवर पालिकेच्या प्रत्येक विभागाने केलेल्या कामामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. ही सकारात्मक बाब आहे.
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.