Corona Virus News : कोरोना योद्धा डॉक्टरांनाच जेव्हा रुग्णवाहिका मिळविण्यासाठी करावा लागतो संघर्ष..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 12:15 PM2020-10-07T12:15:21+5:302020-10-07T12:16:01+5:30
महापालिकेकडे कार्डियाक अॅम्ब्युलन्स नसल्याने गैरसोय
नारायण बडगुजर
पिंपरी : अतितातडीची सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवेत कार्यरत एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली. पिंपरीतील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. तेथून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांची कसरत झाली. कोरोनायोद्धा असलेल्या डॉक्टर व त्यांच्या नातेवाईकांनाच प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
खेड तालुक्यातील चांडोली येथील डॉ. कृष्णा आल्हाट (वय ५४) हे पाच-सहा वर्षांपासून १०८ रुग्णवाहिका सेवेत कार्यरत आहेत. रुग्णवाहिकेतून रुग्णांची ने-आण करताना डॉक्टर म्हणून ते कर्तव्य बजावतात. कोरोनाचा संसर्ग झाल्याने डॉ. आल्हाट यांना १५ सप्टेंबरला नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. त्यासाठी डॉ. आल्हाट यांचे कुटुंबीय सोमवारी सकाळपासून कोविड सेंटर येथे प्रक्रिया पार पाडत होते. दुपारच्या सुमारास कार्डियाक रुग्णवाहिका आली. मात्र, डिस्चार्जच्या प्रक्रियेस विलंब झाल्याने चालक रुग्णवाहिका घेऊन निघून गेला. रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून कुटुंबीयांनी पुन्हा प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे विनवण्या केल्यानंतर पहिल्या रुग्णवाहिकेचा चालक रुग्णवाहिका घेऊन पुन्हा तेथे दाखल झाला. कार्डियाक असूनही या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर तसेच संबंधित डॉक्टर नव्हते. त्यामुळे रुग्ण घेऊन जाता येणार नाही, असे चालकाने सांगितले.
................................
डॉक्टर म्हणून माझे पती कृष्णा आल्हाट यांनी कोरोना काळातही सेवा दिली. मात्र, आता त्यांचीच परवड होत आहे. त्यांच्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही दिवसभर प्रयत्न केले. दोघेही डॉक्टर असूनही आमचे असे हाल होत आहेत. सर्वसामान्य रुग्ण व नातेवाइकांची किती फरपट होत असेल, हे यावरून दिसून येते.
- डॉ. नीता आल्हाट, चांडोली, ता. खेड