Corona Virus : दोन दिवस ‘गायब’ असलेल्या 'त्या' कोरोना रुग्णाच्या मृत्यूचीच आली खबर अन् कुटुंबियांवर आभाळ कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 12:24 PM2020-09-05T12:24:59+5:302020-09-05T12:27:32+5:30
प्रशासकीय गोंधळ थांबेना : रुग्णाचे मोबाईल, घड्याळ, पाकिटही गायब
पुणे : कोरोनावरील उपचारांसाठी गरवारे महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला परस्पर जम्बो रुग्णालयात हलविल्यानंतर दोन दिवस हा रुग्ण नेमका कुठे आहे याचीच माहिती नातेवाईकांना मिळाली नाही. दोन्हीकडून आमच्याकडे हा रुग्णच नाही अशी उत्तरे देण्यात येत होती. तिसऱ्या दिवशी मात्र पोलिसांचा अंत्यदर्शनासाठी या असा फोन आला आणि कुटुंबियांवर आभाळ कोसळले. प्रशासकीय गोंधळामुळे कुटुंबियांना या रुग्णाशी शेवटचा संवादही साधता आला नाही.
कसबा पेठेतील आलोकनगरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाला कोरोनावरील उपचारांसाठी 23 ऑगस्ट रोजी गरवारे महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्यांना 30 ऑगस्ट रोजी जम्बो कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. त्यामुळे सर्व नातेवाईक जम्बो कोविड सेंटरवर चौकशी करण्यासाठी गेले. तेथे हा रुग्ण जम्बोमध्ये नसल्याचे सांगण्यात आले. कुटुंबियांनी वारंवार विनंती केल्यानंतरही केवळ रुग्णाची नोंद दिसत नाही, इथे रुग्ण नाही अशी उत्तरे दिली जात होती. 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत नातेवाईक जम्बो रुग्णालयाच्या बाहेर बसून होते. आपला रुग्ण नेमका गेला कुठे याचा शोध घेत होते. जम्बोचे अधिकारीही त्यांना आम्हीही त्यांचा शोध घेत आहोत असे सांगत होते.
दोन्ही ठिकाणी रुग्ण सापडत नसल्याने हवालदिल झालेल्या कुटुंबियांना अखेर 2 सप्टेंबर रोजी पोलिसांना फोन आला. त्यांनी, रुग्णाचा मृत्यू झाला असून त्याच्या अंत्यदर्शनासाठी या असे सांगितले. या रुग्णाचा जम्बो रुग्णालयातच मृत्यू झाल्याचे समोर आले. चार दिवस शोध घेऊनही जम्बोमध्येच उपचार घेत असलेल्या रुग्णाचा शोध लागला नाही हे प्रकरण गंभीर आहे. दोन दिवस कोणत्याही नोंदीमध्ये न दिसणारा रुग्ण मृत्यू झाल्यानंतर कसा काय आढळतो असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रुग्णाकडे असलेल्या पिशवीसह मोबाईल, पाकीट आदी वस्तू गहाळ झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करुन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.